मुंबईतील लोकलसेवा सुरु करण्यासाठी हालचाली वाढल्या; उद्धव ठाकरेंनी दिला शब्द !

uddhav thakre and local

मुंबई : कोरोना विषाणूला प्रतिबंध घालण्यासाठी राज्यासह देशात लॉकडाऊन करण्यात आला होता. या काळात सार्वजनिक वाहतूक देखील पूर्णपणे बंद करण्यात आली होती. तर, मुंबईकरांची लाईफलाइन असलेल्या लोकलची सेवा देखील या काळात बंद करण्यात आली होती. जूनमध्ये काही प्रमाणात लॉकडाऊन उठवल्यानंतर अत्यावश्यक सेवांच्या कर्मचाऱ्यांसाठी लोकल सुरु करण्यात आली होती.

यानंतर, राज्य सरकारने महत्वाचं पाऊल उचलत सामान्य महिलांसाठी लोकलचा प्रवास सुरू करून नवरात्रोत्सवाची भेट दिली. मात्र, लोकलने प्रवास करण्याच्या वेळेची मुभा फारशी उपयोगी नसल्याची प्रतिक्रिया अनेक महिलांनी दिली होती. तर, सर्वांसाठी लोकलसेवा सुरु करण्यासाठी ही एक प्रकारची चाचणी असल्याचे बोललले जाऊ लागले होते. यानंतर, मंत्री विजय वडेट्टीवार यांनी जानेवारीच्या सुरुवातीला लोकलसेवा सुरु केली जाईल, असं विधान केलं होतं.

मात्र, आता जानेवारी महिना संवत आला तरी सामान्य मुंबईकरांसाठी लोकलसेवा सुरु करण्यात आलेली नाही. आता, खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोकल सुरु करण्याबाबत भाष्य केलं आहे. मुंबईतील लोकल रेल्वे सेवा सर्वांसाठी सुरू करण्यासंदर्भात आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आढावा घेण्यात आला. यासंदर्भातील निर्णय लवकरच घेण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी दिली.

दरम्यान, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव अद्याप संपलेला नसल्याने गर्दी होणार नाही अशा पद्धतीने लोकल सेवा सर्वांसाठी कशाप्रकारे सुरु करता येईल यादृष्टीने विविध पर्यायांवर या बैठकीत चर्चा झाली. या बैठकीला मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, सचिव आबासाहेब जराड, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बालसिंह चहल, आपत्ती व्यवस्थापन संचालक अभय यावलकर यांच्यासह मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल, आणि पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक आलोक कंसल, मुंबई पोलीस आयुक्त परम बीर सिंह, आदी अधिकारी उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या