शेतकऱ्यांवर गोळीबार करणारे राष्ट्रवादीवाले कोणत्या तोंडाने मते मागत आहेत ?

टीम महाराष्ट्र देशा- शेतकऱ्यांवर गोळीबार करणारे, शेतकऱ्यांचे रक्त सांडणारे नतद्रष्ट काँग्रेस, राष्ट्रवादी कोणत्या तोंडाने मते मागत आहेत, असा थेट सवालशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी इस्लामपूर येथील विराट जाहीर सभेत केला आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची विराट सभा झाली. यावेळी बोलताना ठाकरे यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीवर जोरदार आसुड ओढले.

मी शेतकरी नेता नाही, पण शेतकऱ्यांच्या डोळय़ातील अश्रू, त्यांचे भाव मला कळतात. मी शेतकऱ्यांचा मित्र आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठीच मी युती केली आहे; कारण शेतकरी आणि माझे रक्ताचे नाते आहे, असे भावनिक उद्गार देखील त्यांनी काढले. तर राहुल गांधी वीर सावरकरांना भित्रा म्हणतात. सावरकरांना भित्रा म्हणणारा नालायक माणूस संसदेत पोहचता कामा नये, असा एकेरी उल्लेख करत उद्धव ठाकरे यांनी तोफ डागली.

दरम्यान, राजू शेट्टी म्हणजे उसाला लागलेला कोल्हा आहे. या कोल्ह्याला हाकलून लावायचे आहे. हा कोल्हा कारखानादाराच्या मांडीला मांडी लावून नव्हे, तर मांडीवर जाऊन बसला आहे, असा जोरदार हल्लाबोल खोत यांनी चढवला.या कोल्ह्याचा बंदोबस्त या निवडणुकीत आपल्याला सगळ्यांना करायचा आहे. म्हणून शिवसेनेचे उमेदवार धैर्यशील माने यांना निवडून द्या, असे आवाहन खोत यांनी यावेळी केले.