मराठा क्रांती मोर्चावेळी एक भूमिका तर मुलाखतीत वेगळी भूमिका का ?- उद्धव ठाकरे

sharad uddhav

टीम महाराष्ट्र देशा- मराठा क्रांती मोर्चाचा जोर सुरू झाला व मराठा समाजाचे लाखाचे मोर्चे निघू लागले तेव्हा मराठा समाजास आरक्षण मिळायला हवे अशी त्यांची भूमिका होती. या मोर्चात अजित पवारांपासून सगळेच नेते सामील झाले. ‘मराठा’ समाजास आरक्षण द्यावे ही एक भूमिका पवार यांनी आधीच घेतली आहे. मग पुण्यातील ऐतिहासिक मुलाखतीत त्या भूमिकेस बगल मारून आर्थिक निकषावरच आरक्षण मिळावे या भूमिकेची टाळी वाजविण्याचा प्रयत्न ते का करीत आहेत?असा थेट सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे. शरद पवार हे बेरजेचे राजकारण करतात मात्र गेली काही वर्षे त्यांचे गणित चुकते आहे. त्यांच्या बेरजा-वजाबाक्यांची उजळणी पुन्हा घ्यावी लागेल. ऐतिहासिक मुलाखतीमुळे शरद पवार इतिहास जमा तर होणार नाहीत ना? अशी काळजी आम्हाला वाटते म्हणत  ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी झालेल्या शरद पवार यांच्या मुलाखतीवर निशाणा साधला आहे . सामना या शिवसेनेच्या मुखपत्रातून शरद पवारांवर टीका करण्यात आली आहे.

Loading...

sharad pawar , raj thakare

नेमके काय म्हटले आहे अग्रलेखात?

पवारांची काळजी वाटते!
महाराष्ट्रापासून मुंबई कुणालाच तोडता येणार नाही व विदर्भाचा लचकाही ‘केक’सारखा कापता येणार नाही, या शिवसेनाप्रमुखांच्या भूमिकेचीच उजळणी श्री. पवार यांनी त्यांच्या मुलाखतीतून केली. उजळणीत बेरजेला महत्त्व आहे. शरद पवार आधी उत्तर काढतात व मग वरचे बेरीज-वजाबाकीचे आकडे भरतात. गेली काही वर्षे पवारांचे उत्तर चुकते आहे. त्यांच्या मुलाखतीतील ‘उत्तरे’ बरोबर असली तरी त्यांच्या बेरजा-वजाबाक्यांची उजळणी पुन्हा घ्यावी लागेल. ऐतिहासिक मुलाखतीने पवार इतिहासजमा तर होणार नाहीत ना? आम्हाला काळजी वाटते हो!

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पुण्यनगरीत नुकतीच एक ऐतिहासिक की काय अशी मुलाखत दिली. त्यात त्यांनी एक ऐतिहासिक भूमिका मांडली. श्री. पवार यांनी सांगितले की, ‘‘मला जातीपातीचे राजकारण मान्य नाही.’’ पवार यांनी पुण्याच्या भूमीवरून फुले-आंबेडकर-शाहूंच्या महाराष्ट्राला असाही संदेश दिला की, ‘‘जातीपातीवर आधारित आरक्षण नीती मोडून काढली पाहिजे.’’ श्री. पवार यांचे म्हणणे असे की, ‘आज विविध समाजघटकांकडून आरक्षणासाठी आंदोलने होत असली तरी जातीच्या निकषावर नव्हे तर आर्थिक निकषावरच आरक्षण द्यायला हवे!’ पवार यांनी मांडलेली भूमिका ही फक्त टाळ्य़ा मिळविण्यासाठीच असावी. पण या भूमिकेवर त्यांना टाळ्य़ा मिळण्याची शक्यता नाही. टाळी देण्यासाठी जो दुसरा हात लागतो तो त्यांच्या आसपासही दिसत नाही. कारण स्वतः शरद पवार हे देशातले ज्येष्ठ नेते असले तरी राजकारणातील त्यांच्या भूमिकांना कधीच स्थैर्य मिळाले नाही व जातीच्या राजकारणास पाठबळ देणाऱया भूमिका ते घेत राहिले. शरद पवार यांचा पूर्ण मान राखूनच आम्ही हे बोलत आहोत. ‘मंडल’ राजकारणाचा जोर सुरू असताना जातीय आधारावरच पवारांनी शिवसेनेत फूट पाडण्याचा प्रयत्न कसा केला, हे काही फुले-आंबेडकर-शाहूंचा महाराष्ट्र विसरलेला नाही. मराठा क्रांती मोर्चाचा जोर सुरू झाला व मराठा समाजाचे लाखाचे मोर्चे निघू लागले तेव्हा मराठा समाजास आरक्षण मिळायला हवे अशी त्यांची भूमिका होती. या मोर्चात अजित पवारांपासून सगळेच नेते सामील झाले. ‘मराठा’ समाजास

आरक्षण द्यावे
ही एक भूमिका पवार यांनी आधीच घेतली आहे. मग पुण्यातील ऐतिहासिक मुलाखतीत त्या भूमिकेस बगल मारून आर्थिक निकषावरच आरक्षण मिळावे या भूमिकेची टाळी वाजविण्याचा प्रयत्न ते का करीत आहेत? मराठा व धनगर समाजाचे काही सामाजिक व आर्थिक प्रश्न निर्माण झाले आहेत. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा अभ्यास केला तर आत्महत्येचा मार्ग स्वीकारणारे बहुसंख्य ‘जीव’ हे मराठा समाजातील आहेत. राज्यकर्त्या जमातीवर शिवरायांच्या महाराष्ट्रात ही वेळ का आली? कालपर्यंत देणाऱ्या या समाजावर मागण्याची वेळ कुणी आणली? व अस्तित्वाच्या लढाईसाठी हा समाज रस्त्यावर का उतरला, याचे उत्तर श्री. पवार यांच्यासारख्या नेत्यांना द्यावे लागेल.

maratha kranti morcha

आज जातीपातीचे ‘गठ्ठे’ आपापल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरले आहेत व महाराष्ट्राचा सामाजिक एकोपा त्यामुळे बिघडला आहे. आगी लावणाऱ्यांना बळ द्यायचे काम करायचे व नंतर नामानिराळे राहायचे, हे राजकीय स्वार्थाचे गनिमी कावे राज्याला कडेलोटाकडे नेत आहेत. भीमा-कोरेगावच्या दंगलीने महाराष्ट्राचे नुकसान झाले आहे. राज्याचे मन भंगले आहे. ही दंगल नक्की कोणी घडवली याचा थांगपत्ता लागण्याआधीच पेटलेल्या महाराष्ट्राची ‘चिंता’ म्हणून श्री. पवार अचानक मीडियासमोर अवतीर्ण झाले व दंगलीमागे हिंदुत्ववादी संघटनांचा हात असल्याचे सांगून अदृश्य झाले. दंगलीमागे फक्त हिंदुत्ववाद्यांचाच हात असल्याचे कोणते पुरावे त्या वेळी श्री. पवार यांच्या ‘अदृश्य’ हातात होते? सुकलेल्या गवतावर काडी फेकण्याचाच हा प्रयत्न होता. महाराष्ट्रात व देशात पवारांना मान आहे व त्यांच्या

राजकीय अनुभवाविषयी आदर
आहे. त्यांचे वय झाले आहे असे आम्ही सांगणार नाही, पण त्यांचा अनुभव वाढत आहे. लवकरच आमच्या मनोहर जोशींप्रमाणे त्यांचा सहस्रचंद्रदर्शन सोहळा होईल, पण शरदचंद्र पवारांचे तेजस्वी विचार नेमके काय आहेत ते महाराष्ट्राला कधीच समजले नाहीत. २०१४ मध्ये महाराष्ट्रात भाजप सरकारला पाठिंबा देण्यासाठी ते सगळ्य़ात आधी पुढे आले व तेव्हा ‘जातीय’वादी भाजप त्यांना तेजःपुंज वाटला! आज भाजपचा पराभव हे त्यांचे ध्येय बनले आहे. या विचाराशी तरी ते ठाम राहोत. शरद पवार यांच्या शब्दाला राजकारणात नेहमीच वजन राहिले आहे. वडीलधारे म्हणून आम्हीही त्यांना नेहमीच वाकून नमस्कार करतो. शिवसेनाप्रमुखांचे ते मित्र होतेच, पण शिवसेनाप्रमुखांनी महाराष्ट्रास जातीय अराजकापासून वाचविण्याचे काम केले व त्यासाठी स्वतः चटके सोसले. जातीला पोट आहे, पण पोटाला जात लावू नका, असे शिवसेनाप्रमुख नेहमीच म्हणत असत. जाती-पातीवर नको तर आर्थिक निकषावरच आरक्षण हवे, अशी ठाम भूमिका पहिल्यापासून शिवसेनाप्रमुखांनी घेतली. महाराष्ट्रापासून मुंबई कुणालाच तोडता येणार नाही व विदर्भाचा लचकाही ‘केक’सारखा कापता येणार नाही, या शिवसेनाप्रमुखांच्या भूमिकेचीच उजळणी श्री. पवार यांनी त्यांच्या मुलाखतीतून केली. उजळणीत बेरजेला महत्त्व आहे. शरद पवार आधी उत्तर काढतात व मग वरचे बेरीज-वजाबाकीचे आकडे भरतात. गेली काही वर्षे पवारांचे उत्तर चुकते आहे. त्यांच्या मुलाखतीतील ‘उत्तरे’ बरोबर असली तरी त्यांच्या बेरजा-वजाबाक्यांची उजळणी पुन्हा घ्यावी लागेल. ऐतिहासिक मुलाखतीने पवार इतिहासजमा तर होणार नाहीत ना? आम्हाला काळजी वाटते हो!Loading…


Loading…

Loading...