मुंबई : आज मुंबईतील बेकेसीमध्ये मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा आयोजित करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून विरोधकांनी विविध मुद्द्यांवरुन सत्ताधारी शिवसेनेला व ठाकरे सरकारला लक्ष्य केलं आहे. त्यामुळं आजची सभा वादळी ठरणार असल्याचे अंदाज बांधले जात आहेत. संजय राऊत यांनी ‘मुख्यमंत्र्यांची आजची सभा ही आतापर्यंच्या शंभर सभांचा बाप आहे’ असल्याचेही म्हंटले आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून पहिल्यांदाच अशा प्रकारे जाहीर सभा घेत असल्यामुळे या सभेत ते काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सभेच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी विरोधीपक्षांना जोरदार टोले लागावले आहे. “ही सभा ऐतिहासिक आहे. कोविड, लॉकडाऊन, मुख्यमंत्र्यांचं आजारपण यामुळे उद्धव ठाकरे अशा सभांच्या व्यासपीठावर मध्यंतरी आले नव्हते. ते आता येत आहेत. ही सभा लोकांच्या, विरोधकांच्या मनातल्या प्रश्नांना सडेतोड उत्तर देणारी असेल. ही सभा फक्त त्यासाठीच नाही. गेल्या काही दिवसांत विरोधकांनी महाराष्ट्राचं वातावरण गढूळ करण्याचा, लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचा, महाराष्ट्र अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. पुरोगामी महाराष्ट्राच्या पायावर हल्ले चालवले आहेत. या सगळ्याबाबत उद्धव ठाकरे परखडपणे बोलतील अशी आमची अपेक्षा आहे”, असं संजय राऊत म्हणाले.
“उद्धव ठाकरेंची ही सभा टोमणे सभा नसून फटके सभा आहे, असे संजय राऊत म्हणाले आहेत. महाराष्ट्रात विरोधी पक्षाचा नंगानाच सुरू आहे. विरोधी पक्षाची मती भ्रष्ट झाली आहे. त्यातून हे सगळं होतंय. पण आज होणारी उद्धव ठाकरेंची टोमणे सभा नसून हटके आणि फटके सभा आहे. ज्याला तुम्ही टोमणे म्हणता, त्याला आम्ही फटकारे म्हणतो. ते तुम्हाला कधीच जमणार नाही. ठाकऱ्यांची भाषा तुम्हाला जमणार नाही. तुम्हाला काय माहिती मराठी आणि महाराष्ट्राचा इतिहास?” असा सवालही संजय राऊत यांनी केला.
महत्वाच्या बातम्या –