ज्यांना सोनिया गांधींनी ‘गेट आऊट’, म्हणून हाकलून दिलं त्यांनी आमच्या नादी लागू नये- उद्धव ठाकरे

udhav thakrey

टीम महाराष्ट्र देशा: सोनिया गांधींनी ‘गेट आऊट’ म्हणून ज्यांची हकालपट्टी केली त्या शरद पवारांनी माझ्या नादाला लागू नये. नाही तर तुम्हाला सोडणार नाही, असा सज्जड दमच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांना दिला आहे. ते मिरज येथे शेतकरी मेळाव्यात बोलत होते.

“मी जनतेच्या व्यथा ऐकण्यासाठी फिरतो आहे आणि शरद पवार माझ्यावर टीका करीत आहेत. मोदी-पवार यांचे गुरू-शिष्याचे नाते आहे म्हणे. पवार म्हणतात की, सत्तेत असून मित्र पक्षावर टीका करणारे मी पहिल्यांदाच बघितले. वसंतदादांच्या पाठीत वार करणारेही मीही पहिल्यांदाच बघितले आहेत. त्यावेळी ‘पुलोद’ काढून खुर्चीसाठी टण करून तुम्ही उडी मारली. सोनिया गांधींनी ‘गेट आऊट’, म्हणून तुम्हाला हाकलून दिले होते. तरीही त्यांच्यासोबत राहून तुम्ही 15 वर्षे भांडी घासली. ‘मैद्याचं पोतं’ हे शब्द आम्ही विसरलो नाही. त्या आठवणी आम्हाला काढायला लावू नका. अशी घणाघाती टिका उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर केली आहे.

त्याचप्रमाणे आमच्या भानगडीत तुम्ही पडू नका आणि आम्हाला सल्ले देऊ नका. आमच्या भगव्याची आपुलकी, जिव्हाळा, निष्ठा शरद पवार पुसू शकत नाहीत. पवार हे मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन भेटत नाहीत तर ते क्रिकेटवर चर्चा करतात. अहो, मुख्यमंत्र्यांकडे प्रश्न घेऊन जा, असा सल्लाही उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांना दिला आहे. आता यावर शरद पवार यांच्याकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहण्यासारख असणार आहे.