‘मिशन राम मंदिर’ : उद्धव ठाकरेंच्या स्वागताची आयोध्येत जंगी तयारी

Uddhav_Thackray

टीम महाराष्ट्र देशा- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी अयोध्यानगरी सज्ज झाली आहे.  अयोध्यावासीयांबरोबरच संत-महंतांमध्ये मोठा उत्साह आहे. प्रत्येक चौक आणि वळणावर उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी कमानी उभारल्या गेल्या आहेत. फैजाबादपासून अयोध्येपर्यंत होर्डिंग्ज, बॅनर्स आणि पोस्टर्स झळकली आहेत.

देशाच्या कानाकोपऱयातून असंख्य शिवसैनिक, शिवसेनाप्रेमी, रामभक्त अयोध्येत दाखल झाले आहेत. उद्धव ठाकरे शनिवारी सायंकाळी अयोध्येत शरयू आरती करणार आहेत. त्याच वेळी देशभरातील विविध मंदिरांमध्येही महाआरती होणार आहे. मुंबईतील मंदिरेही घंटानादाने दुमदुमणार आहेत. शिवसैनिकांसह हजारो आबालवृद्ध त्यात सहभागी होणार आहेत. महाआरतीच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी शिवसेना शाखांमधून शेकडो शिवसैनिक ‘जय श्रीराम’ असा जयघोष करत मोटारबाईक रॅलीने निघणार आहेत.

उद्धव ठाकरेंचा अयोध्येतील कार्यक्रम

अयोध्येतल्या क्षत्रिय, ब्राह्मण, वैश्य असे वेगवेगळे समाज, भोजपुरी सभा यांच्याकडून उद्धव ठाकरे यांचा नागरी सत्कार केला जाणार आहे. ‘लक्ष्मण किला’वर उद्धव ठाकरे यांचा साधुसंतांकडून सत्कार होणार आहे. रामचरित मानस आणि रामललांची मूर्ती घेऊन उद्धव ठाकरे येणार आहे. पूजेनंतर ते साधूसंतांकडून आशीर्वाद घेतील. ‘लक्ष्मण किला’वरील कार्यक्रम संपल्यानंतर उद्धव ठाकरे चालत शरयूच्या काठावर जाऊन आरती करतील. शिवनेरी गडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या मातीचा कलश घेऊन उद्धव ठाकरे अयोध्येत जाणार आहेत. शिवनेरीवर बाल शिवाजी आणि जिजामाता यांना अभिवादन करुन उद्धव ठाकरेंनी माती सोबत घेतली. संजय राऊत, राजन विचारे, एकनाथ शिंदे, विश्वनाथ महाडेश्वर अयोध्येला गेले आहेत.

शिवसेनेचा जन्म हा राजकारणासाठी नाही तर सेवेसाठी झालाय : आदित्य ठाकरे