सगळाच वेडय़ांचा बाजार! -उद्धव ठाकरें

Uddhav-Thackeray-1

आगामी महापालिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपा-शिवसेनेमध्ये युतीवरून धुसफूस सुरू असून ‘पारदर्शक कारभार हा युतीचा अजेंडा हवा’ अशी अट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घातली होती. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी टीकास्त्र सोडले आहे. ‘ कारभारात पारदर्शकता हवी असे आता राज्यकर्त्यांतर्फे ऊठसूट सांगितले जाते, पण पारदर्शक कारभार कसा याचे प्रात्यक्षिक त्या वेडय़ा ठरवण्यात आलेल्या जवानाने दाखवले’ असा टोला त्यांनी ‘सामना’च्या अग्रलेखातून लगावला आहे. राज्यकर्ते वेडय़ासारखे निर्णय घेतात. ते बरोबर ठरवणारे जवानांच्या आक्रोशाला वेडे ठरवतात. एकंदरीत काय तर सगळाच वेडय़ांचा बाजार! अशी टीका उद्धव यांनी केली आहे.

‘जय जवान जय किसान’ असे कधीकाळी आपल्या देशात गर्वाने म्हटले जायचे, पण आज किसान व जवान दोघांची स्थिती गंभीरच म्हणावी लागेल. किसान म्हणजे शेतकरी हा पूर्वीही रोज आत्महत्या करीतच होता. आता ‘नोटाबंदी’नंतर विष खाण्यासाठीही त्याच्या खिशात चिल्लर उरलेली नाही. अर्थात जवानांचे तरी बरे चालले आहे का? कश्मीर खोऱयात एक दिवसाआड जवानांच्या कॅम्पवर पाकपुरस्कृत दहशतवाद्यांचे हल्ले होत आहेत व त्यात आमचे जवान मारले जात आहेत. म्हणजेच हौतात्म्य पत्करीत आहेत. अशा जवानांचे तिरंग्यात लपेटलेले पार्थिव त्यांच्या गावी नेले जाते व सरकारी इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातात. ‘अमर रहे’च्या घोषणा देऊन नंतर सर्वकाही शांत होते, ही झाली एक बाजू. पण दुसऱया बाजूला सीमांचे रक्षण करणाऱया इतर सुरक्षा दलांमधील जवानांना निकृष्ट दर्जाचे अन्न खावे लागत असल्याचे सत्य बाहेर आल्याने सरकारच्या प्रतिष्ठेला धक्का बसला आहे.
–  तेजबहादूर यादव या जवानाने एक व्हिडीओ व्हायरल करून कोणत्या दर्जाचे कच्चे, निकृष्ट अन्न जवानांना पुरवले जाते याचा पर्दाफाश केला. यावर हा जवान ठार वेडा किंवा मानसिक रुग्ण असल्याचे सरकारतर्फे सांगितले, पण त्याजवानास वेडा ठरवून प्रश्न निकाली लागणार आहे काय? ‘‘माझा पती वेडा किंवा मानसिक  रुग्ण असेल तर ‘बीएसएफ’ने देशाच्या दृष्टीने महत्त्वाच्या सीमेवर तैनात असताना त्याच्या हातात बंदूक दिलीच कशी?’’ असा सवाल तेजबहादूर या जवानाच्या पत्नीने केला आहे व हा सवाल चुकीचा नाही; कारण जेवणाचा वाद सुरू असतानाच सीआयएसएफ म्हणजे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या एका जवानाने बिहारात भयंकर कृत्य केले. बलबीर नामक या जवानाने अंदाधुंद गोळीबार करून आपल्याच चार सहकारी जवानांना ठार केले. अनेक महिन्यांपासून सुट्टी न मिळाल्याने बलबीर चिडला होता व त्याच संतापाच्या भरात त्याने हा माथेफिरूपणा केला. केंद्र सरकारच्या महत्त्वाच्या प्रकल्पांना सुरक्षा देण्याची जबाबदारी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलावर आहे. विमानतळे, अणुऊर्जा प्रकल्प, पेट्रोलियम प्रकल्पांच्या सुरक्षेचे काम हे जवान करतात व त्यांनासुद्धा रोजच्या अडचणीने त्रस्त केल्याने ते माथेफिरू होऊ लागले आहेत.
– एका तेजबहादूरला वेडे ठरवून सरकार मोकळे झाले, तसे या बलबीरलाही वेडा ठरविणार आहात का? जवानांत खासकरून ‘वर्दी’तला असंतोष असाच खदखदत राहिला तर देशाला नव्या संकटाला सामोरे जावे लागेल. केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या आणखी एका जवानाने समस्यांचा व्हिडीओ समोर आणून जनतेला खरी स्थिती दाखवली आहे. ‘सीआरपीएफ’चे सर्व जवान कर्तव्ये प्रामाणिकपणे बजावतात. मात्र लष्करी जवानांच्या तुलनेत आम्हाला दुय्यम वागणूक दिली जाते. आम्हाला लष्कराप्रमाणे सुविधा दिल्या जात नाहीत असा आक्रोश जितसिंह या जवानाने केला आहे.
– अर्थात सरकारच्या दृष्टीने ‘जवान’ आणि ‘पोलीस’ बांधवांचा आक्रोश म्हणजे बेशिस्तपणा असल्याने त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाते किंवा असा आक्रोश करणाऱयांना सरकारतर्फे ‘वेडे’ अथवा ‘मनोरुग्ण’ ठरवून त्यांच्या वेदनेची माती केली जाते. जवान वेडे, आत्महत्या करणारे शेतकरी ठार वेडे, ‘नोटाबंदी’सारख्या विषयावर परखड सत्य मांडणारे देशद्रोही; मग या देशात शहाणे कोण? याचाही एकदा रोखठोक खुलासा केलेला बरा. कारभारात पारदर्शकता हवी असे आता राज्यकर्त्यांतर्फे ऊठसूट सांगितले जाते, पण पारदर्शक कारभार कसा याचे प्रात्यक्षिक त्या वेडय़ा ठरवण्यात आलेल्या जवानाने दाखवले. जळून खाक झालेली व जळून भोके पडलेली रोटी त्या जवानास खावी लागते. ही पारदर्शकताच आहे. डाळीचा पत्ता नसलेले पिवळे पाणी व त्यातून दिसणारा वाटीचा तळ हे तर पारदर्शक व ‘स्वच्छ’ कारभाराचेच लक्षण मानावे लागेल. राज्यकर्ते वेडय़ासारखे निर्णय घेतात. ते बरोबर ठरवणारे जवानांच्या आक्रोशाला वेडे ठरवतात. एकंदरीत काय तर सगळाच वेडय़ांचा बाजार!