शेतकऱ्यांना फक्त हमी भावच नाही तर हमखास भाव देणार – उद्धव ठाकरे

uddhav thakrey

मुंबई : महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा तिसरा दिवस होता. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अभिभाषणावर चर्चा करण्याचा अखेरचा दिवस होता. गेले तीन दिवस भाजपने राज्य सरकारवर विविध विषयांवरून हल्लाबोल केला आहे. विरोधकांच्या टीकेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज चोख प्रत्युत्तर दिलं आहे.

यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर देखील भाष्य केलं आहे. ‘पुढच्या वर्षी बाजारपेठेत कोणत्या पिकाला मागणी असेल ते विचारात घेऊन दर्जेदार उत्पादन आणि हमी भावच नाही तर हमखास भाव मिळाला पाहिजे यासाठी ‘विकेल ते पिकेल’ ही योजना सुरू केली आहे. त्यासाठी मार्केटचे सर्व्हेक्षण करण्यात येत आहे.’ अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.

तर, शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी सौर कृषी वीज पंपाची योजना मोठ्या प्रमाणात राबवणार आहोत असेही त्यांनी सांगितले. पुढील 50 वर्षांचा विचार केल्यास कांजूरमार्गची जागा मेट्रो कारशेडसाठी फायदेशीर ठरणार आहे. त्यामुळे या जागेबाबत सर्वांनी एकत्र येऊन मार्ग काढूया असे आवाहनही मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले.महाराष्ट्रामध्ये उद्योगांकडून थेट गुंतवणूक होते. त्यामुळे उद्योगांतील गुंतवणुकीत महाराष्ट्र नक्कीच आघाडीवर आहे, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

शेतकऱ्यांच्या मार्गात खिळे आणि चीन दिसल्यावर पळे !

‘पंजाब-हरियाणाचे शेतकरी आपल्या मागण्यांसाठी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करण्यासाठी बसले आहेत. त्यांनी राजधानी दिल्लीत प्रवेश करू नये म्हणून अडथळ्यांच्या भिंती उभ्या केल्या गेल्या. रस्त्यात खिळे ठोकले गेले, त्यांचा वीजपुरवठा बंद केला गेला, त्यांच्या सोयीसुविधा बंद केल्या. मात्र दुसरीकडं चीनने आपल्या भूमीवर कब्जा प्रयत्न केला. चीनसमोर हे पळाले. हे म्हणजे, शेतकऱ्यांच्या मार्गात खिळे आणि चीन दिसल्यावर पळे,’ असं म्हणत उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केलं आहे.

महत्वाच्या बातम्या