पुढील पंचवीस वर्ष उद्धव ठाकरे मुख्यमंत्री राहणार – संजय राऊत
मुंबई : महाविकास आघाडी सरकार स्थापन होऊन आता अडीच वर्षे पूर्ण झाली आहेत. कॉमन मिनिमम प्रोग्रॅमच्या आधारे महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आलं. मात्र अडीच वर्षानंतरही तिन्ही पक्षांपमध्ये धुसफूस कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. आपल्या कार्यकर्त्यांच्या फोडाफोडीचे आरोप एकमेकांवर तिन्ही पक्ष कायम करताना दिसतात. तरी तिन्ही पक्षातील वरिष्ठ नेते सरकार मजबूतीने काम करत असल्याचे कायम सांगत आले आहेत. अशातच नुकतंच आता मुख्यमंत्री पदाच्या बाबतीत राष्ट्रवादीच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांनी पुढच्या वेळी राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होणार असं विधान केले होते. यानंतर आता संजय राऊत यांनीही मुख्यमंत्री पदाबाबद मोठं विधान केले आहे.
सुप्रिया सुळे रविवारी उस्मानाबादच्या दौऱ्यावर होत्या. यावेळी त्यांनी तुळजापूरच्या तुळजाभवानी मातेचं दर्शन घेतलं. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. सुप्रिया सुळे म्हणाल्या, “राज्यात अजूनपर्यंत राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झालेला नाही. दिवसेंदिवस राज्यात राष्ट्रवादीची ताकद वाढत आहे. आता पुढच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाला पाहिजे. अंबाबाईच्या आशीर्वादाने जर राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाला तर संपूर्ण पक्ष घेऊन तुळजाभवानीच्या दर्शनाला येईन”.
सुप्रिया सुळे यांनी केलेल्या विधानावर संजय राऊत म्हणाले, “उद्धव ठाकरे सध्या मुख्यमंत्री असून हेच २५ वर्ष मुख्यमंत्री राहतील असं सुप्रिया सुळेंचं म्हणणं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात असे संभ्रम काही लोक निर्माण करत असतात. सध्या महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार आहे. आघाडीचं नेतृत्व उद्धव ठाकरे करत आहेत. शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, सोनिया गांधी, राहुल गांधी हे सर्वजण उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर आनंदी आहेत. त्याच्यामुळे कोणी प्रश्न निर्माण केला असेल तर त्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे”.
महत्वाच्या बातम्या –