दसरा मेळाव्याचं भाषण उद्धव ठाकरे व्यासपीठावरूनच करणार : संजय राऊत

dasara melava uddhav thakrey

मुंबई : शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला अनेक वर्षांची परंपरा आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हयातीत असताना या दसरा मेळाव्याची सुरुवात मुंबईमध्ये करण्यात आली. यानंतर शिवसेनाप्रमुख दसऱ्याचं औचित्य साधून शिवसैनिकांना संबोधित करण्याला कधीच खंड पडला नाही. यंदा मात्र खुद्द शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदावर विराजमान असताना शिवाजी पार्कवर पार पडणाऱ्या या सोहळ्यावर कोरोनाचे सावट आहे.

राजकीय समीकरण बदललं आणि २०१९ च्या विधानसभा निकालानंतरच्या घडामोडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत जाऊन शिवसेनेने सत्तास्थापन केली. त्याच शिवतीर्थावर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये नवा जोश निर्माण झाला. मात्र फेब्रुवारीच्या मध्यानंतर कोरोनाचा शिरकाव देशात झाला आणि पुढे हा उद्रेक वाढतच गेला.

त्यामुळे यावर्षी शिवतीर्थावर हजारो शिवसैनिकांच्या साक्षीने दसरा मेळावा घेणे हे मात्र शक्य होणार नाही असं स्पष्ट असल्याने शिवसैनिकांच्या उत्साहाचा काही प्रमाणात हिरमोड झाला आहे. तर, शिवसेना पक्षाच्या स्थापनेपासून सुरू असलेली परंपरा खंडित होणार नाही, असा शिवसेना नेतृत्वाचा प्रयत्न आहे.

मात्र, शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांनी आता दसऱ्या मेळाव्यावर मोठं विधान केलं आहे. दसरा मेळावा घेण्याबाबत सकारात्मक चर्चा सुरू आहे. ठाकरे घराण्यातील मुख्यमंत्री म्हणून हा पहिलाच दसरा मेळावा असणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं भाषण व्यासपीठावरूनच होईल, असं संजय राऊत यांनी सांगितलं आहे.

दसरा मेळाव्याचं महत्त्व राजकीय आणि सांस्कृतिक देखील आहे. त्यामुळे दसरा मेळावा कसा घ्यायचा याबाबत चर्चा होईल. नियम आणि आरोग्याच्या दृष्टीनं योग्य होईल, अशा पद्धतीनं नियोजन केलं जाईल, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली आहे. तर, या मेळाव्याला शिवसैनिकांना ऑनलाईन पद्धतीने सामील होता येईल, त्यासाठी तयारी सुरु असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

महत्वाच्या बातम्या-