‘चुकीला माफी नाही’,बीडमध्ये शिवसैनिकांनी अजित पवारांचा पुतळा जाळला!

बीड : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातील वाद चांगलाच पेटला आहे.पुण्यात राष्ट्रवादीने सामना या शिवसेनेच्या मुखपत्राची होळी केल्यानंतर आता बीडमध्ये अजित पवारांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करून शिवसैनिकांनी पवारांच्या वक्तव्याचा निषेध केला.

भ्रष्टाचाराच्या गटारात राहणाऱ्यानी गुण संपन्न व्यक्तीवर चिखलफेक करू नये, हा शिवरायांचा महाराष्ट्र अजित पवारांना कधीच माफ करणार नाही, अशा शब्दात शिवसैनिकांनी अजित पवारांचा निषेध केला.अजित पवारांची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वर टीका करण्याची लायकी नाही, संपूर्ण महाराष्ट्राला दुष्काळात ढकलण्याचे पाप अजित पवारांनी केले आहे, या पुढे अजित पवारांना माफी नाही, असं कार्यकर्ते यावेळी म्हणाले.

दरम्यान,शिवसेनेने राम मंदिर बांधू असे जाहीर केल्यावर अजित पवार यांनी त्यांची खिल्ली उडवली होती. त्यानंतर ‘सामना’तर्फे आज प्रकाशित करणाऱ्या अग्रलेखात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने पुण्यात सामना कार्यालयजवळील चौकात आंदोलन केले. यावेळी सामनाची होळी करण्यात आली तर संपादक खासदार संजय राऊत यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले.