Share

Uddhav Thackeray | “मोदी आयोध्यातील श्रीरामाचे पूजन करतात अन् अनुयायी भलत्याच रामाच्या…”, उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा

Uddhav Thackeray | मुंबई : निवडणुकांचा धुरळा उडू लागला की पॅरोलचा लाभ हरयाणात फक्त बाबा रामरहीमलाच का मिळतो? मग त्यास असे वारंवार पॅरोलवर बाहेर काढण्यापेक्षा त्याची सर्व शिक्षा माफ करा आणि बाबांना भाजपचे स्टार प्रचारक म्हणूनच नेमून टाका! नाहीतरी बाबांच्या सत्संग कार्यक्रमास हजेरी लावून भाजपवाले त्यांच्या ‘पिताजी’चा आशीर्वाद घेतच आहेत. तिकडे पंतप्रधान मोदी अयोध्येतील प्रभू श्रीरामाचे पूजन करीत असताना त्यांचे अनुयायी भलत्याच ‘रामा’च्या चरणी लीन झाले. राम… राम… राम…! यांचा कोणता राम खरा? मूंह में राम आणि बगल में ‘रामरहीम’ हेच खरे !!, असा घणाघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सामना (Saamana) आग्रलेखातून केला आहे. तसेच यावेळी ठाकरेंनी भाजप (BJP) पक्षावर जोरदार हल्लाबोल देखील केला.

यादरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडे केदारनाथ, बद्रीनाथ, उज्जैन, अयोध्या असे तीर्थाटन केले. अयोध्येत तर पंतप्रधानांनी दिवाळी दीपोत्सवातही भाग घेतला. रामलल्लाची आरती केली. प्रभू रामचंद्राने शब्द, विचार आणि नियमांच्या माध्यमातून रुजविलेली मूल्ये ‘सबका साथ, सबका विकास’ या घोषवाक्याची प्रेरणा आहेत, असे पंतप्रधानांनी अयोध्येत सांगितले. मोदी यांचा ओढा पहिल्यापासून अध्यात्माकडे आहे. दुसरे म्हणजे त्यांना सत्संगाचे वेड आहे. त्यामुळे पंतप्रधानपदी असले तरी वेळात वेळ काढून ते सत्संग करीत असतात, पण भाजपमधील त्यांचे अनुयायी भलत्याच ‘सत्संगा’ला लागल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले व हा सत्संग फक्त राजकीय फायद्यासाठी आहे. हरयाणाच्या सिरसास्थित डेरा सच्चा सौदाचे प्रमुख गुरमीत रामरहीम सिंग यांचे नाव कुणाला माहीत नाही? हे बाबा दोन तरुणींवर बलात्कार, एका पत्रकाराची निर्घृण हत्या आणि इतर गंभीर गुन्ह्यांत आजन्म जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत. त्यांची 40 दिवसांच्या पॅरोल रजेवर मुक्तता झाली असून सध्या हे बाबामहाराज त्यांच्या बागपत जिल्हय़ातील बरनावा येथील आश्रमी मुक्कामास आहेत. पॅरोलवर असताना बाबांनी ‘सत्संग’ सुरू केला व त्यास हरयाणातील भाजपच्या अनेक प्रमुख नेत्यांनी हजेरी लावली. समाजमाध्यमांवर बाबांचा सत्संग व त्यास हजेरी लावणाऱ्या भाजपवाल्यांची धुलाई सध्या सुरू आहे. डेरा बाबांच्या सत्संगात सहभागी होणाऱ्यांत भाजपचे अनेक प्रमुख नेते आहेत. कर्नालच्या महापौर रेणुबाला गुप्तांसह उपमहापौर, भाजपचे पदाधिकारी बाबांच्या सत्संगात सामील झाले. यापैकी अनेकांनी बाबांच्या चरणी लोटांगण घालून आशीर्वाद घेतल्याचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत, असं देखील त्यांनी आग्रलेखात म्हटलं आहे.

कर्नालच्या महापौर रेणुबाला बाबा रामरहीम यांनाबोलतात, “पिताजी, आपला आशीर्वाद सदैव असून द्यात.” हा सर्वच प्रकार अनैतिक व धक्कादायक आहे. एका बाजूला पंतप्रधान मोदी अयोध्येतील नीतिमान रामाची आरती करतात. “रामासारखी निष्ठा व नीतिमत्ता देशाला नव्या उंचीवर नेईल. रामाची मूल्ये पुढील 25 वर्षात सर्वाधिक खडतर ध्येय साध्य करण्यासाठी लागणाऱ्या धैर्यासाठी दीपस्तंभासारखी ठरतील,” असे हितगुज करतात. मात्र त्याच वेळी भाजपचे लोक प्रभू श्रीरामास सोडून भलत्याच ‘रामा’च्या चरणी लीन होताना दिसतात. हरयाणा सरकारनेच रामरहीम यांच्या सिरसा येथील आलिशान आश्रमात प्रचंड पोलीस दल घुसवून रामरहीम बाबांना अटक केली होती. त्यावेळी आश्रमातील गुंडांनी पोलिसांवर गोळीबार केला होता. मोठीच हिंसा व रक्तपात तेव्हा घडला होता. बाबांच्या अटकेनंतर हरयाणात बाबांच्या समर्थकांनी जाळपोळ केली. तेव्हा भाजप सरकारने हे दंगेधोपे मोडून बाबा रामरहीम यांना जेरबंद केले. या बाबांवर खून, बलात्कारसारखे गुन्हे होते व त्यास राजकीय पाठबळ असल्याने कोणी हात लावायला धजावत नव्हते. बाबांचा पंथ मानणारे लोक पंजाब, हरयाणात आहेत व त्या व्होट बँकेकडे पाहून बाबांच्या गुन्ह्यांकडे कानाडोळा होत असे. पण पाणी डोक्यावरून गेले व हत्यारी पोलीस बाबांच्या आश्रमात घुसले. त्यानंतर बाबांना अटक झाली, खटला चालला आणि बाबांना आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. पण जेव्हा जेव्हा पंजाब किंवा हरयाणात निवडणुका आल्या त्या त्या वेळी बाबा रामरहीम यांना हमखास पॅरोलवर बाहेर काढण्यात आले, असं देखील उद्धव ठाकरे म्हणाले.

आताही हरयाणात पंचायत निवडणुका आहेत. शिवाय एक विधानसभा पोटनिवडणूक आहे व त्यासाठी बाबांना सत्संगासाठी पॅरोलवर मुक्त केले आहे, ही शंका लोकांच्या मनात आहे. एका वर्षात या बाबांना तीन वेळा ‘पॅरोल’ मिळाला आणि प्रत्येक वेळेला पंजाब किंवा हरयाणात कोणती ना कोणती निवडणूक होती, हा योगायोगच म्हणावा लागेल. एका वर्षात तीन वेळा ‘पॅरोल’ मिळू शकतो काय यावर देशाचे गृहमंत्रालयच प्रकाश पाडू शकेल. कारण हरयाणाचे सन्माननीय जेल मंत्री रणजित सिंग यांनी जाहीर केले, “शंका घेण्याचे कारण नाही. सर्वकाही नियमानेच झाले. ही एक रुटिन प्रोसिजर आहे!” मग या रुटिन प्रोसिजरचा लाभ देशाच्या तुरुंगांमध्ये खितपत पडलेल्या इतर कैद्यांना का मिळत नाही? आसाराम बापूंना का मिळत नाही? निवडणुकांचा धुरळा उडू लागला की पॅरोलचा लाभ हरयाणात फक्त बाबा रामरहीम यांनाच का मिळतो? मग त्यांना असे वारंवार पॅरोलवर बाहेर काढण्यापेक्षा त्यांची सर्व शिक्षा माफ करा आणि बाबांना भाजपचे स्टार प्रचारक म्हणूनच नेमून टाका! नाहीतरी बाबांच्या सत्संग कार्यक्रमास हजेरी लावून भाजपवाले त्यांच्या ‘पिताजीं’चा आशीर्वाद घेतच आहेत. देशभरात भाजपच्या या नव्या सत्संगाची चर्चा सुरू आहे. भाजपचे हे हिंदुत्व आहे की मतांसाठीचा जिहाद? की आणखीन काही? आता दोषी रामरहीम यांना पुन्हा पॅरोल मिळाला आहे व अनेक भाजप नेत्यांनी त्यांच्या सत्संगात हजेरी लावल्याचे वक्तव्य तृणमूलच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी केले. पण एरवी महिलांवरील बलात्कार, अत्याचार वगैरेंवर पोपटपंची करणारे भाजपचे कातडी पांघरलेले वाघ – वाघिणी यावर बोलायला तयार नाहीत. तिकडे पंतप्रधान मोदी अयोध्येतील प्रभू श्रीरामाचे पूजन करीत असताना त्यांचे अनुयायी भलत्याच ‘रामा’च्या चरणी लीन झाले. राम…. राम… राम…! यांचा कोणता राम खरा ? मूंह में राम आणि बगल में ‘रामरहीम’ हेच खरे !!, असा घणाघात सामनातून करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या :

Uddhav Thackeray | मुंबई : निवडणुकांचा धुरळा उडू लागला की पॅरोलचा लाभ हरयाणात फक्त बाबा रामरहीमलाच का मिळतो? मग त्यास …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now