राज्यपालांप्रमाणे मुख्यमंत्र्यांचीही नियुक्ती करा – उद्धव ठाकरे

बंगळुरू – कर्नाटक मध्ये सत्तासंघर्ष आता टोकाला पोहचला आहे. कर्नाटकमध्ये काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी सत्ता स्थापनेचा दावा केल्याने अखेर मुख्यमंत्री कोण होणार. याकडे सर्वांचं लक्ष लागलं होत. अखेर येडियुरप्पा यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आता बहुमत सिद्ध करण्याचं त्यांच्यापुढे आव्हान असणार आहे. सुप्रीम कोर्टात रंगलेल्या युक्तीवादानंतर, अखेर काल सकाळी 9 वाजता येडियुरप्पा यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल वजुभाई वाला यांनी येडियुरप्पा यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली.

मात्र भाजपकडे बहुमत नसतानाही राज्यपालांनी त्यांना सत्ता स्थापनेसाठी बोलावल्याने विरोधी पक्षांकडून भाजप आणि राज्यपाल वजुभाई वाला यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. दरम्यान भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने देखील भाजपवर निशाना साधला आहे.देशात कर्नाटक निवडणुकीच्या निमित्ताने जे सुरु आहे ते पाहिल्यावर या देशात लोकशाहीची अवहेलना होते आहे ही असली लोकशाही काय कामाची असे म्हणत राज्यपालप्रमाणे मुख्यमंत्री ही नेमा आणि निवडणुकीत खर्च होणारा पैसा आणि वेळ वाचवा अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

या देशात लोकशाहीची अवहेलना होणार असेल तर ही लोकशाही काय कामाची निवडणुका घेऊच नका म्हणजे मोदीना विदेशवारी करण्यात अडचण येणार नाही, राज्यपाल जसे नेमता तसे मुख्यमंत्री नेमा असा जबरदस्त टोला शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज लगावला. आज खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उल्हासनगर येथील जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनानिमित्त उद्धव ठाकरे उल्हासनगर येथे आले असताना बोलत होते.

Gadgil