हिंमत असेल तर उध्दव ठाकरेंनी मंत्र्यांना मंत्रालयाची पायरी न चढण्याचे आदेश दयावेत – नवाब मलिक

मुंबई  – उध्दव ठाकरे नाणारमध्ये जावून नाणार प्रकल्प रद्द झाल्याचे जाहीर करतात आणि दुसरीकडे भाजपचे पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान नाणार प्रकल्पाचा करार करतात ही जनतेची दिशाभूल असून भाजपमंत्र्यांना मातोश्रीची पायरी चढू दिली जाणार नाही असे सांगण्यापेक्षा हिंमत असेल तर उध्दव ठाकरे यांनी आपल्या मंत्र्यांना मंत्रालयाची पायरी चढू नका असा आदेश दयावा असे थेट आव्हान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिले.

शिवसेना नाणार प्रकल्प रद्द झाल्याची घोषणा करते आणि दुसरीकडे भाजपचे मंत्री नाणार प्रकल्पाचा करार करते या भूमिकेवर नवाब मलिक यांनी जोरदार हल्लाबोल केला.

राज्याचे उदयोगमंत्री सुभाष देसाई यांनी नाणार प्रकल्पाची अधिसूचना रद्द करण्यात येत असल्याची घोषणा केली. तर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी नाणारमध्ये जावून नाणार प्रकल्प रद्द केल्याची घोषणा केली होती. परंतु असे असतानाही केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ३ लाख कोटीच्या नाणार प्रकल्प करारावर सही केली. त्यानंतर शिवसेनेने भाजपमंत्र्यांना मातोश्रीची दारे बंद असल्याचे स्पष्ट केले.

नाणार रद्द झाला असताना प्रधान यांनी करार केला कसा असा सवाल करतानाच नाणार प्रकल्पाबाबत जनतेची दिशाभुल केली जात असल्याचा आरोपही नवाब मलिक यांनी केला.

मातोश्रीच्या पायऱ्या भाजप मंत्र्यांनी कधी चढायच्या हे उध्दव ठाकरे यांनी ठरवावे परंतु आपल्या मंत्र्यांनी मंत्रालयाच्या पायऱ्या कधी चढू नये याची घोषणा ते कधी करणार हे लवकरच जाहीर करावे अन्यथा त्यांनी पायऱ्यांचे नाटक बंद करावे असा सल्लाही नवाब मलिक यांनी दिला.

नाणार प्रकल्पाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अधिकृत भूमिका स्पष्ट करताना कोकणाला दुषित करणारा रासायनिक प्रकल्प नको आहे. कोकणातील जनतेला प्रदुषित प्रकल्प नको असेल तर सरकारने जमिनी घेण्याची आणि प्रकल्प लादण्याची जबरदस्ती करु नये असे सांगतानाच गुजरातच्या भाजप नेत्यांनी सर्वाधिक जमिनी नाणार प्रकल्पाच्याठिकाणी खरेदी केल्या असून त्याची चौकशी व्हायला हवी अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली.