fbpx

आमचं ठरलंय, तुम्ही चिंता करू नका ; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री पदाच्या चर्चेवर सूचक वक्तव्य

टीम महाराष्ट्र देशा : आम्ही युती केली तेव्हा सगळ्या गोष्टींचा विचार करून केली होती. आमचं ठरलंय, तुम्ही चिंता करू नका,असे वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. उद्धव ठाकरे शिवसेनेच्या ५३ व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलत होते. तसेच संघर्षाच्या वेळेला मला शिवसेनाप्रमुखांची आठवण येत नाही कारण त्यांनी मला असे सवंगडी दिले आहेत. मात्र अशा आनंदाच्या क्षणी शिवसेनाप्रमुखांची आठवण येते. त्या सर्व शिवसैनिकांची आठवण येते ज्यांनी शिवसेना मोठी केली, असेही त्यांनी म्हंटले.

आज ( १९ जून ) शिवसेनेचा ५३ वा वर्धापन दिन, वर्धापन दिनानिमित माटुंगा येथील षण्मुखांनाद सभागृहात सायंकाळी ५ वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वर्धापन दिन कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती होती. उद्धव ठाकरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यावेळी, राजकारणासाठी विरोधकांच्या आघाड्या होतात, मात्र आपण आता आता एकसाथ दौडायचे आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. लोकसभेच्या विजयानंतर शिवसेनेचेच नव्हे तर भाजपचे खासदार देखील भेटायला आले होते. हा एकोपा असला पाहिजे. आपण एकमेकांत लढून सोन्याची माती करतो, आता ही माती होऊ द्यायची नाही असे उद्धव ठाकरे यांनी म्हंटले. इतकेच नव्हे तर, शिवसैनिक प्रेम केलं तर भरभरून प्रेम करतो आणि लढायचं म्हटलं तर जीवाची बाजी लावून लढतो. युती करण्याची भावना महत्वाची आहे. राजकारणासाठी विरोधकांच्या आघाड्या होतात. मात्र आता आपण आता एकसाथ दौडू, आपण संघर्ष केल्याने विरोधकांचं फावलं आहे, असेही त्यांनी म्हंटले.

याचबरोबर, शिवसेना आणि भाजपमध्ये मुख्यमंत्रीपदावरून सुरु असलेल्या चर्चेवरही उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले. आम्ही युती केली तेव्हा सगळ्या गोष्टींचा विचार करून केली होती. आमचं ठरलंय, तुम्ही चिंता करू नका, युती करण्याची भावना महत्वाची आहे. देशात अनेक राज्यात युती आणि आघाडी झाली. मात्र आज त्यांची अवस्था काय आहे हे समोर आहे.असे ठाकरे यांनी म्हंटले.

तसेच, मुख्यमंत्र्यांना कार्यक्रमाला बोलावलं तर तुमच्या पोटात का दुखतंय? याआधीही ही परंपरा होती. भाजपचा अधिवेशनात शिवसेना प्रमुखांना आमंत्रित केलं होतं. तसेच अनेक भाजप नेत्यांनीही शिवसेनेच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. मध्यंतरी परंपरा खंडित झाली होती. मात्र मधल्या काळातला दुरावा आता पूर्व नाहीसा झाला आहे, असेही त्यांनी म्हंटले.