मी पाहिलेले उद्धव ठाकरे हे नाहीत : देवेंद्र फडणवीस

टीम महाराष्ट्र देशा : भाजप-सेना युतीचे सरकार असताना जे निर्णय कॅबिनेटमध्ये घेण्यात आले ते सेना-भाजप युती सरकारच्या कार्यकाळात एकत्रितपणे घेतले होते, त्यामुळे अशा निर्णयातून होत असलेल्या कामांना स्थगिती देण्यात काहीच अर्थ नाही, म्हणूनच मी पाहिलेले उद्धव ठाकरे ‘हे’ नाहीत. असे म्हणत विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली.

देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित सम्राट महाडिक आणि राहुल महाडिक यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी ते बोलत होते. फडणवीस म्हणाले, सत्तेत येण्यापुर्वी ठाकरे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजार रूपये देण्याचे आश्वासन दिले होते. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांसाठी केलेली कर्जमाफी ही केवळ औपचारिकता असून या कर्जमाफीने शेतकऱ्यांचा काहीही लाभ होणार नाही. ज्यांना गरज आहे, त्यांना तर या कर्जमाफीचा अजिबात फायदा होणार नाही. असे म्हणत त्यांनी ‘ विश्वासघाताने सत्तेवर आलेल्या या सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे,’ अशी खरमरीत टीकाहि देवेंद्र फडणवीस यांनी केली.

ते पुढे म्हणाले, सप्टेंबर 2019 अखेरपर्यंतचे थकित कर्ज माफ केले जाणार आहे. याचा फायदा कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील पूरग्रस्तांना होणार नाही. कारण,भाजप सरकारने यापुर्वीच हे कर्ज माफ केले आहे. मात्र अवकाळी पावसाने सुमारे ९५ लाख हेक्टर्सवरील शेतीचे नुकसान झाले आहे. अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना यामुळे काहीच हाती लागले नाही. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आता तातडीची गरज असताना सरकारने ती गरज पूर्ण करावी, असा टोलाही त्यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.