‘उद्धव ठाकरे पांढऱ्या पायाचे! ते मुख्यमंत्री झाल्यापासून कोरोना आला, वादळं आली’

रत्नागिरी : राज्यात मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीचा आणि दरडग्रस्त भागाचा राजकीय नेते मंडळी दौरे करत आहेत. केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी आज तळीयेमध्ये येऊन दुर्घटनेची पाहणी केली. यावेळी त्यांनी दुर्घटनाग्रस्तांची विचारपूस करून त्यांचे सांत्वन केले. तसेच अधिकाऱ्यांकडून घटनेची माहिती घेतली. या दौऱ्यादरम्यान नागरिकांना मदतीचे आश्वासन आणि आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरुच आहेत.

नारायण राणे यांनी चिपळूणमधील पूरग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना राज्यात मागील दोन वर्षांपासून सतत संकट येत आहेत असा प्रश्न करण्यात आला होता. यावर राणेंनी मुख्यमंत्री ठाकरेंवर जहरी टीका केली. ‘ राज्यावरील संकटाला कारण राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा पायगुण. ते आल्यापासून वादळं काय? पाऊस काय? सर्व चालुच आहे. कोरोना काय? कोरोना त्यांची देण आहे. मुख्यमंत्री आले करोना घेऊन आले. पाय बघायला पाहीजे, पांढऱ्या पायाचा’, अशी बोचरी टीका नारायण राणे यांनी केली.

‘राज्यात मुख्यमंत्री नाही, प्रशासन नाही अशी भयावह परिस्थिती आहे. पाठांतर करुन यायचे आणि लोकांमध्ये बोलायचे. मागील चार दिवसांपासून लोक अधिकाऱ्यांना जाब विचारत होते. काही कल्पना लोकांना देण्यात आली नाही. धोका लक्षात घेऊन लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करायला पाहिजे होत. राज्य सरकारने तातडीने पावले उचलण्याची गरज होती. या सर्व परिस्थितीला प्रशासन जबाबदार आहे’ असा आरोप राणे यांनी केला.

मुख्यमंत्र्यांना आताच डिस्चार्ज मिळाला
महाड तालुक्यातील तळीये गावात पाहणी केल्यानंतर माध्यमांनी राज्य सरकारशी तुमचं काही बोलणे झालं का? असा सवाल राणेंना केला. त्यावर उत्तर देताना त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर त्यांचं नाव न घेता टीका केली. ‘कुठलं सरकार? महाराष्ट्र सरकारचे लोकं भेटत नाहीत, बोलत नाहीत. आता कुठे डिस्चार्ज झालाय घरातून. त्यामुळे आता फिरत आहेत, अशी टीका राणे यांनी केली.

महत्त्वाच्या बातम्या