‘मिशन राम मंदिर’ : उद्धव ठाकरे कुटुंबासह फैजाबाद विमानतळावर दाखल

टीम महाराष्ट्र देशा- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे अयोध्येत दाखल झाले आहेत. त्यांच्या दोन दिवसांच्या या दौऱ्यासाठी संपूर्ण अयोध्या नगरी नटली असून जागोजागी सडा-रांगोळ्या, भगव्या पताका, स्वागताचे प्रचंड मोठे फ्लेक्स अयोध्या नगरीत लागले आहेत. प्रचंड मोठ्या संख्येने साधू-संत-महंत, शिवसैनिक आणि हिंदू बांधव शरयू तीरावरील या तीर्थनगरीत दाखल झाले आहेत.

रामाचे नाव घेऊन सत्तेवर आलेल्या राज्यकर्त्यांना राममंदिराची आठवण करून देण्यासाठी अयोध्येत दाखल होत असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या दौऱयाविषयी संपूर्ण उत्तर प्रदेशात जबरदस्त उत्सुकता निर्माण झाली असून ‘जय श्रीराम’च्या घोषणांनी रामजन्मभूमी दुमदुमून गेली आहे.

ढोल-ताशांच्या गजरात उद्धव ठाकरेंचे फैजाबद विमानतळावर शिवसैनिकांकडून स्वागत करण्यात आले. यावेळी स्वागतासाठी शिवसेनेचे नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते. विमानतळावर उतरल्यानंतर उद्धव ठाकरेंना विशेष सुरक्षा देण्यात आली आहे. पंतप्रधानांप्रमाणे विशेष प्रोटोकॉल त्यांना देण्यात आला असून याप्रमाणेच त्यांचे स्वागतही करण्यात आले.