Share

Uddhav Thackeray | “मशालच्या पहिल्या विजयानंतर मिंधे गट…”, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

Uddhav Thackeray | मुंबई : अंधेरी पूर्व पोट निवडणूकीत भाजप पक्षाने माघार घेतली होती. अशातच काल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने लढणाऱ्या ऋतुजा लटके यांचा विजय झाला आहे. यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सामना (Saamana) आग्रलेखातून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटावर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.

यादरम्यान, ‘मशाली’च्या पहिल्या विजयाने मिंधे गट व त्यांच्या पोशिंद्यांची पोटदुखी वाढली आहे. तथापि, राज्याची जा आज पुन्हा दिवाळी साजरी करीत आहे. अंधेरी पोटनिवडणुकीच्या रणात उतरून ज्या शिवसैनिकांनी, मतदारांनी शिवसेनेस विजय मिळवून दिला त्यांचे आभार मानायला आमच्याकडे शब्द नाहीत. आम्ही त्या शिवसेनाप्रेमींना साष्टांग दंडवत घालून महाराष्ट्राचा स्वाभिमान राखल्याबद्दल लाख लाख धन्यवाद देत आहोत. विजयाची ही मशाल अशीच पेटत राहील! विरोधकांची ‘बुडे’ जाळत राहील!! राजकीय चिता पेटवत राहील, असा घणाघात उद्धव ठाकरेंनी सामना आग्रलेखातून केला आहे.

तसेच, पोटनिवडणुकीच्या आधी मिंधे गट शिवसेनेतून बाहेर पडला. भाजपबरोबर सरकार स्थापन करून त्यांनी शिवसेना हे नाव व धनुष्यबाण चिन्ह गोठवून घेतले. म्हणजे भाजपने मिंधे गटाच्या खांद्यावर बंदूक ठेवून हा निशाणा साधला. धनुष्यबाण गोठवून भाजप व त्यांच्या मिध्यांना विकृत आनंद मिळाला तरी मुंबईची जनता मात्र शिवसेनेच्या पाठीत झालेले घाव पाहून खवळून उठली. हाती मशाल हे चिन्ह घेऊन नव्या लढय़ासाठी सज्ज झाली. जनता जनार्दनाचा हा संताप पाहून भाजप मिंधे गटाचे उमेदवार कोणी मुरजी पटेल यांना माघार घ्यावी लागली. महाराष्ट्राची परंपरा, संस्कृती, माणुसकी अशा शब्दांच्या टिचक्या मारून भाजपने माघार घेतली होती ती फक्त मुंबईत पहिल्याच निवडणुकीत बेअब्रू होऊ नये म्हणून. मुळात अंधेरी पोटनिवडणूक आपणास लढायची आहे, असा वाद निर्माण करून भाजपपुरस्कृत मिंधे गटाने धनुष्यबाणावर दावा लावला व निवडणूक आयोगाने परंपरा, इतिहास, खरे-खोटेपणाचे भान न ठेवता शिवसेना हे नाव व धनुष्यबाणच गोठवले. ही गोठवागोठवी करून भाजप व त्यांच्या मिंध्यांनी निवडणुकीच्या मैदानातून पळ काढला. आमची मनापासून इच्छा होती, भाजप व त्यांच्या मिंधे गटाचे उमेदवार या निवडणुकीत उतरायलाच हवे होते. म्हणजे मुंबईत आवाज आणि गर्जना कोणाची याचा फैसला लागला असता. अंधेरी पोटनिवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने महाविकास आघाडी म्हणून ऐक्य राखले, असं देखील ठाकरेंनी म्हटलं आहे.

भाजप आणि मिंधे गटाने माघारीचे नाटक केले, पण प्रत्यक्षात ‘नोटा’च्या बुरख्याआड रडीचा डाव खेळले. माघारीनंतरही त्यांच्या अंगातले किडे वळवळतच होते. त्यातूनच लोकांनी मतदान केंद्रावर जाऊन ‘नोटा’चे बटण दाबावे, असे प्रयत्न त्यांनी जाणीवपूर्वक केले. वास्तविक, कायद्यानुसार ‘नोटा’चा प्रचार करता येत नाही. ‘नोटा’ हा पूर्णपणे ऐच्छिक विषय आहे. तरीही ‘नोटा’चा प्रचार केला गेला. लोकांनी मतदान केंद्रांवर जाऊन ‘नोटा’चे बटण दाबावे यासाठी काही ‘खोकी’ खर्चण्यात आली. त्यामुळे खोके सरकार आपल्या नामकरणास पुरेपूर जागले. निवडणूक ग्रामपंचायतीची असो नाही तर विधानसभेची, खोक्यांशी नाते कायम ठेवायचे असे या मंडळींनी ठरवले आहे. अंधेरीच्या पोटनिवडणुकीतही तेच झाले. येथे ‘नोटा’साठी नोटा वापरल्या गेल्या. एकूण मतदानापैकी 12 हजार 806 मते ‘नोटा’ या पर्यायाला मिळाली. अर्थात, एवढे सगळे उपद्व्याप करूनही जनता ना ‘नोटां’ना भुलली ना ‘नोटा’च्या भुलभुलैयाला! ‘नोटा’ला झालेले मतदान ही भाजप व मिंधे गटाची मळमळ होती. मतदारांनी मात्र ऋतुजा लटके यांच्या पारडय़ात भरभरून मतदान केले आणि भाजप – मिंध्यांचे कारस्थान उधळून लावले. या पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का कमी होता. पण भाजप किंवा लाचार मिंधे गटाचा उमेदवार असता तर जनता अधिक जोमाने व त्वेषाने मतदान केंद्रावर पोहोचली असती. मतदानाचा आकडा 60 टक्क्यांवर गेला असता व मिंध्यांच्या बुडास मशालीचे चटके बसले असते. अर्थात उद्याच्या मुंबई, ठाणे, महानगरपालिकेत जनतेचा कौल कोठे आहे त्याची ही नांदी आहे. ‘मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका कधी होणार ते फक्त ईश्वरालाच ठाऊक,’ असे गमतीचे विधान श्री. देवेंद्र फडणवीस यांनी मध्यंतरी केले, अशी टीका देखील करण्यात आली आहे.

दरम्यान, मिंधे गटाचा पाळणा कितीही हलवला तरी तो रिकामाच राहील व कोणत्याही वेळी महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुकांची घोषणा होईल, अशा हालचाली राजकीय भूगर्भात सुरू आहेत याची मिंधे गटास कल्पना नाही. आम्ही मात्र कोणत्याही मैदानात उतरून आव्हानांचे घाव परतवून लावण्यास तयार आहोत. अंधेरीच्या पोटनिवडणुकीचा निकाल तेच सांगतोय. धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यावर शिवसेना खचेल, हतबल होईल असे ज्यांना वाटत होते त्यांचे डोळे अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतील ‘मशाली’च्या विजयी भडक्याने दिपले आहेत. ‘मशाली’च्या पहिल्या विजयाने मिंधे गट व त्यांच्या पोशिंद्यांची पोटदुखी वाढली आहे. तथापि, राज्याची जनता मात्र आज पुन्हा दिवाळी साजरी करीत आहे. दुष्मनांना कात्रजचा घाट दाखविण्यासाठी शिवरायांनी मशालीचाच वापर केला होता. तो इतिहास जरा आमच्या विरोधकांनी समजून घेतला पाहिजे. अंधेरी पोटनिवडणुकीच्या रणात उतरून ज्या शिवसैनिकांनी, मतदारांनी शिवसेनेस विजय मिळवून दिला त्यांचे आभार मानायला आमच्याकडे शब्द नाहीत. आम्ही त्या शिवसेनाप्रेमींना साष्टांग दंडवत घालून महाराष्ट्राचा स्वाभिमान राखल्याबद्दल लाख लाख धन्यवाद देत आहोत. आम्ही समोरून वार करणारे आहोत, पण शत्रूने वार वर्मी बसण्याआधीच रणातून पळ काढला. अशा पळपुटय़ांनी विजयी मशालीवर उगाच गुळण्या टाकण्याचे प्रयत्न करू नयेत. विजयाची ही मशाल अशीच पेटत राहील! विरोधकांची ‘बुडे’ जाळत राहील!! राजकीय चिता पेटवत राहील, असं सामनातून म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

Uddhav Thackeray | मुंबई : अंधेरी पूर्व पोट निवडणूकीत भाजप पक्षाने माघार घेतली होती. अशातच काल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now