खंजीर उलटू शकतो हे ध्यानात ठेवा; उद्धव ठाकरेंचा भाजपला इशारा

udhav thakre

मुंबई – भाजपचे खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पालघर लोकसभा मतदार संघात पोटनिवडणूक होत असून, या पोटनिवडणुकीच्या जबाबदारीची धुरा भाजपने उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर सोपवली आहे.

योगी आदित्यनाथ यांनी पालघरमध्ये घेतलेल्या प्रचारसभेत शिवसेनेवर टीकेची झोड उठवली. वनगा कुटुंबीय आणि त्यांच्या पुत्राला उमेदवारी देणे हा भाजपाचा अंतर्गत मामला होता. त्यात नाक खुपसण्याचे शिवसेनेला काहीही कारण नव्हते. तरीही त्यांनी ती आगळीक केल्याचं आदित्यनाथ यांनी म्हंटलं आहे. तसेच शिवसेना नाव जरी छत्रपती शिवाजी महाराजांचे घेत असली तरी तिची करणी मात्र अफजलखानाची आहे. शिवसेनाप्रमुखांना कुणीही विसरू शकणार नाही. कारण त्यांनी कधीही कोणाच्याही पाठित खंजीर खुपसला नाही. परंतु आता ते कार्य शिवसेनेकडून सुरू असल्याचं त्यांनी म्हंटलं होतं.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी आज योगी आदित्यनाथ यांच्या या वक्तव्याचा शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून समाचार घेतलाय. ”ज्यांनी शिवसेनाप्रमुखांच्या पाठीत त्यांच्या हयातीत खंजीर खुपसले त्याच हातांना तुम्ही ‘मेहंदी’ लावून नवरदेव बनवलेत ना? त्यामुळे घात, विश्वासघात, खंजीर खुपसणे वगैरे शब्द योगी किंवा देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडी शोभत नाहीत.

खंजीर उलटू शकतो हे ध्यानात ठेवा. अफझलखानाचा कोथळा असाच निघाला होता. अफझलखानाने शिवरायांच्या पाठीत खंजीर खुपसला. शिवरायांनी सरळ समोरून खानाचा कोथळाच काढला. ज्यांना शिवरायांना हार घालण्याआधी पायातल्या चपला काढता येत नाहीत त्यांच्याकडून काय अपेक्षा करायची”, अशा शब्दांत त्यांनी भाजपवर टीका केली आहे.