Video- उदयनराजे-शिवेंद्रराजे समर्थकांना पुन्हा जामीन मंजूर

सातारा : सुरुचि धुमश्चक्रीप्रकरणी अटकेत असताना जिल्हा रुग्णालयाच्या प्रिझन वॉर्डमध्ये डान्स करणा-या उदयनराजे-शिवेंद्रराजे समर्थक सहा जणांचा जिल्हा व सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. मात्र, पुढील सुनावणीपर्यंत त्यांना जिल्ह्याबाहेर राहण्याचे आदेश दिले आहेत. आनेवाडी टोलनाका व्यवस्थापन हस्तांतरणाप्रकरणी सुरुचि बंगल्यासमोर झालेल्या धुमश्चक्रीत आमदार व खासदार समर्थकांना अटक करण्यात आली होती .

दरम्यान, काहींनी आजारी असल्याचे कारण दाखवित स्वत:ला जिल्हा रुग्णालयाच्या प्रिझन वॉर्डमध्ये दाखल करून घेतले. त्यांना जामीन मंजूर झाल्याची माहिती मिळताच खासदार समर्थक इम्तियाज बागवान, बाळू ढेकणे, विशाल ढाणे, केदार राजेशिर्के, विक्रम शेंडे व किरण कु-हाडे यांनी मोबाईलवर गाणी लावून डान्स केला.या प्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी उपविभागीय पोलीस अधिकारी राजलक्ष्मी शिवणकर यांना चौकशीचे आदेश दिले. त्यानुसार न्यायालयात अहवाल सादर करीत आरोपींचा जामीन मंजूर करू नये, अशी मागणी केली होती.

आरोपींच्या वकिलाच्या युक्तिवादानंतर जिल्हा न्यायाधीश वाय. एस. अमेठा यांनी सहाजणांचा जामीन मंजूर केला.फोनवरून रोज माहिती देण्याचे निर्बंध या सहाही आरोपींनी जामीन मिळाल्यानंतर पुढील सुनावणीपर्यंत जिल्ह्याबाहेरच राहावे. दर आठवड्यातून दोनवेळा शाहूपुरी पोलीस ठाण्यात हजेरीला यावे. तसेच तपास अधिका-यांना फोनद्वारे रोजच्या ठिकाणाबाबत माहितीही द्यावी, असेही आदेश न्यायालयाने दिले आहेत.