फलटणकरांच्या बांडगुळपणामुळे नको त्यांचं फावलंय : खा. उदयनराजे

टीम महाराष्ट्र देशा: फलटणकरांच्या बांडगुळपणामुळे नको त्यांचं फावलंय, असा टोला रामराजे निंबाळकर यांना खा. उदयनराजे भोसले यांनी फलटण येथे बोलताना लगावला. फलटण मधल्या एका माणसामुळेच जिल्ह्याला कीड लागली असून तो माणूस माझं नाव घेत असेल तर त्याचं चॅलेंज मी स्वीकारत आहे असल्याचं देखील उदयनराजे यांनी जाहीर केलं आहे.

नेमकं काय म्हणाले उदयनराजे ?

खा. उदयनराजे म्हणाले, देशात लोकशाही आहे त्यामुळे खासदारकीसाठी कोणीही उभा राहू शकतो. जनतेने संधी दिल्यास कोणीही आमदार, खासदार होऊ शकतो, पण टिकाटिप्पणी करताना प्रत्येकाने आत्मपरिक्षण केले पाहिजे. जिल्ह्यात माझ्यावर बिनबुडाचे आरोप होत असतील तर ते मी सहन करून घेणार नाही. आतापर्यंत मी सहन करत आलो आहे, पण सहनशक्तीलाही मर्यादा आहेत. लबाडी मी केली नाही, सडेतोड उत्तर द्यायला मी तयार आहे. समोरासमोर कुठेही, केव्हाही, कोणत्याही व्यासपीठावर बोलवा, माझी तयारी आहे. पण फलटणकरांनी बांडगुळपणा सोडला पाहिजे. फलटणकरांनी हाक द्यावी, कोणताही प्रश्न हाताळायला मी तयार आहे, पण मला साथ द्यायला हवी. फलटणला गतवैभव प्राप्त करुन देऊ शकतो.