‘आरक्षणाच्या लढ्यात बलिदान केलेल्या तरुणांना उच्च न्यायालयाने दिली खरी श्रद्धांजली’

udyan raje bhosale1

टीम महाराष्ट्र देशा : मराठा आरक्षणाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निकाल दिला आहे. मराठा समाजाला राज्य सरकारकडून देण्यात आलेले आरक्षण हे घटनेच्या बाहेर नसून ते वैध आहे, असा निर्णय उच्च न्यायालयाने दिला आहे. या निकालानंतर राज्यभरात मराठा समाजाने जल्लोष व्यक्त केला आहे. तर सातारचे खा. उदयनराजे भोसले यांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. त्यांनी आपल्या फेसबूक अकाऊंटवरून पोस्ट करत मराठा समाजाचे अभिनंदन केले आहे.

“मराठा आरक्षणावर शिक्कामोर्तब; सर्वांना आरक्षणाच्या शुभेच्छा. आरक्षणाच्या लढ्यात ५० पेक्षा जास्त तरुणांचं बलिदान झालं, हे आरक्षण त्यांना खरी श्रद्धांजली असेल. माननीय उच्च न्यायालयाने मराठा समाजाची बाजू ऐकून त्यांना न्याय दिला, त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार. मराठा क्रांती मोर्चाला पाठिंबा देणाऱ्या महाराष्ट्रातील सर्व समाज घटकांचे जाहीर आभार. या लढ्यामध्ये प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत करणाऱ्या व रस्त्यावर उतरलेल्या सर्व समाज बांधवांचे जाहीर आभार व अभिनंदन”, अशा आशयाची उदयनराजेंनी पोस्ट केली आहे.

दरम्यान, राज्यात शैक्षणिक क्षेत्रात व सरकारी नोकऱ्यांमध्ये मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्यासंबंधी ३० नोव्हेंबर, २०१८मध्ये राज्य सरकारने कायदा मंजूर केला होता. या कायद्याला विरोध करणाऱ्या तर काही सरकारच्या निर्णयाचे समर्थन करणाऱ्या याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या. या याचिकांवर उच्च न्यायालयाने निकाल दिला आहे.

राज्य सरकारला १०२च्या घटना दुरुस्तीनुसार आरक्षण देण्याचा अधिकार आहे, असे न्यायालयाने म्हंटले. इतकेच नव्हे तर आयोगानुसार मराठा समाज मागास आहे. अपवादात्मक स्थितीत ५०टक्के आरक्षणात बदल शक्य असल्याचेही न्यायालयाने म्हंटले आहे. याचबरोबर मराठा समाजाला आरक्षण सुरु राहील परंतु १६ टक्के नाही, असेही न्यायालयाने म्हंटले. नोकरी आणि शिक्षणिक शेत्रातील आरक्षण वैध आहे. परंतू १२ ते १३ टक्के आरक्षण देता येईल, असे न्यायालयाने म्हंटले आहे.