उदयनराजे-पंकजा मुंडे भेट,भाजप प्रवेशाच्या चर्चांना उधाण

मुंबई : राष्ट्रवादीचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची माहिती पुढे आली. त्याचवेळी त्यांनी मंत्री पंकजा मुंडे यांचीही भेट घेतली. मात्र, ही भेट विकासकामांसाठी असल्याचे स्पष्टीकरण उदयनराजे भोसले यांनी दिलेय. दरम्यान, राष्ट्रवादीकडून त्यांना उमेदवारी मिळणार नसल्याने त्यांनी भाजप नेत्यांची भेट घेतल्याचे बोलले जात आहे. तर खासदार भोसले हे भाजपमध्ये प्रवेश करतील, अशा चर्चांना उधाण आले आहे.

उदयनराजेंनी केवळ मुख्यमंत्र्यांचीच नव्हे तर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आणि अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापटांचीही भेट घेतली. राष्ट्रवादीच्या मुंबईतील बैठकीत भोसले यांच्या नावाची कोणीही शिफारस केली नाही. या बैठकीनंतर उदयनराजेंनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, आपण साताऱ्यातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक आहोत. पवारसाहेब जो निर्णय घेतील तो मान्य असेल. मात्र, शरद पवारांचे जसे सर्वपक्षीय मित्र आहेत तसे आपलेही सर्व पक्षात मित्र आहेत, असा सूचक इशाराही त्यांनी यावेळी दिला होता.

दरम्यान,राष्ट्रवादीतून उदयनराजे यांच्या लोकसभा उमेदवारीला होणारा विरोध पाहून विविध पक्षांनी राजेंना आपल्या पक्षातून लोकसभा निवडणूक लढवण्याची ऑफर देण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्र स्वाभिमान,रिपब्लिकन पक्षाचे नेते तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनीही उदयनराजेंना आपल्या पक्षात आमंत्रण दिले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज असलेले खासदार उदयनराजे भोसले यांची राष्ट्रवादीकडून अवहेलना सुरू आहे. स्वतःचा अपमान करून घेण्यापेक्षा स्वाभिमानाने पुन्हा भाजपमध्ये यावे, असे जाहीर निमंत्रण भाजपचे माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांनी सुद्धा दिले आहे.

उदयनराजेंना भाजपची ऑफर ? अर्धा तास दरवाजाबंद चर्चा

आज आरक्षणासाठी जीव देणारे उद्या जीव घ्यायलाही मागेपुढे पाहणार नाहीत : उदयनराजेLoading…
Loading...