मी सांगून कंटाळलो पण काँग्रेस-राष्ट्रवादीने माझ एकही काम केले नाही-उदयनराजे भोसले

टीम महाराष्ट्र देशा:- लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात सर्वत्र विधानसभेचे वारे वाहत आहेत. त्यानुसारच भाजप आणि शिवसेनेत जोरदार इनकमिंग सुरु आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादला गळती लागली असून नेत्यांनी सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेत प्रवेशाचा धडाकाच लावला आहे. त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उधान आले आहे. मात्र उदयनराजे यांनी एका वृत्तवाहिनीशी भाजप प्रवेशावर बोलताना सांगितले की, माझ्या सोबत काम करणाऱ्या सहकाऱ्यांना मी याबाबत विचार करुन निर्णय घ्या, असे सांगितले आहे.

रविवारी उदयनराजे यांच्या समर्थकांची त्यांच्या येत्या काळातील राजकीय वाटचालीबद्दलचा निर्णय घेण्यासाठी एक बैठक बोलवण्यात आली होती. त्याबाबत बोलताना उदयनराजे म्हणाले,जे काही होईल ते लोकांच्या हिताचं होईल. माझ्या सहकाऱ्यांना तुम्ही विचार करुन निर्णय घ्या आणि मला सांगा असं मी त्यांना सांगितले आहे. गेली २५ -३० वर्षे ज्या लोकांनी खऱ्या अर्थाने मला साथ दिली ते माझ्यासाठी महत्त्वाची आहेत असं उदयनराजे यावेळी म्हणाले.

तसेच त्यांनी यावेळी बोलताना काँग्रेस-राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता असताना त्यांनी माझं एकही काम केलं नाही. मी सांगून कंटाळलो पण काम झालं नाही असा आरोपही यावेळी उदयनराजेंनी केला आहे.तसेच ते पुढे म्हणाले. आम्ही लोकासाठी लढलो, रस्तारोको केला, आमच्यावर केसेस झाल्या. काही कारण नसताना माझ्यावर खंडणीची केस दाखल झाली. ३०२ ,३०७ सारखे गुन्हे दाखल झाले. खोट्यानाट्या केसेस झाल्या. तसेच राजकारण सुरु असते. सत्ता इकडची तिकडं जाते, मंत्री बदलतात. मी सत्तेचा कधी अट्टहास केला नाही. मेगाभरतीला मी भीक घालत नाही, आम्हाला गरज पण नाही, असे उदयनराजे यावेळी म्हणाले.

दरम्यान रविवारी सोलापूरमध्ये अमित शहा यांच्या उपस्थित राष्ट्रवादीचे माजी खासदार धनंजय महाडिक यांच्यासह माण-खटावचे काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे व उस्मानाबादचे राष्ट्रवादीचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.याच सोलापुरातील भाजपच्या मेगा भरतीत उदयनराजे भाजप प्रवेश करतील असं बोललं जात होतं मात्र त्यांचा अजून निर्णय झाला नसल्याचे माहिती समोर येत आहे.