ब्रेकिंग : मुख्यमंत्र्यांनी अवघ्या काही तासांतच पूर्ण केला छत्रपतींचा पहिला आदेश…

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणूकीनंतर आता सर्वत्र विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. सर्वच पक्षांनी पक्षबांधणी, राजकीय दौरे, भेटीगाठी यांसारख्या राजकीय घडामोडींना उधाण आले आहेत. सर्वच पक्षांनी जनसंपर्क साधण्यासाठी वेगवेगळ्या यात्रांचे आयोजन केले आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपची महाजनादेश यात्रा सुरु आहे. या यात्रेचा तिसरा टप्पा सुरु आहे.

या यात्रेतील सातारा येथील सभेत मुख्यमंत्र्यांनी ‘इतिहासात जेव्हा जेव्हा एखाद्या मावळ्यांनं चांगलं काम केलं तेव्हा तेव्हा छत्रपतींनी पगडी घालून त्यांचं कौतुक केले. आज मला उदयनराजे यांनी पगडी घातली आणि शिवेंद्रसिंहराजे यांनी मला तलवार दिली, तसेच पुढे बोलताना छत्रपतींनी मागणी करायची नसते तर आदेश द्यायचा असतो हा मावळा तो नक्की पूर्ण करेल असं विधान केले आहे.

मुख्यमंत्र्यांच्या या विधानानंतर अवघ्या काही तासांमध्ये उदयनराजेंचा आदेश पाळला आहे. त्यांनी सातारा शहराच्या हद्दवाढीचा प्रश्न मार्गी लावला आहे. याविषयी ‘गेल्या ४० वर्षांपासून रखडलेल्या सातारा शहराच्या हद्दवाढीवर काल रात्री उशिरा मंत्रालयातून शिक्कामोर्तब करण्यात आला गेल्या अनेक वर्षांपासून केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले याचा मनस्वी आनंद आहे. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे जाहीर आभार असं ट्वीट करून उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहे.