शिवेंद्रराजेंच्या टीकेवर उदयनराजेंचे प्रत्युत्तर; म्हणाले, ‘मी लोटांगण घालत फिरेन…’

shivsendraraje-udayanraje

सातारा : सातारा नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले पुन्हा एकदा आमने-सामने आले आहेत. सातारा शहरातील विकासकामांचे उद्घाटन, पाहणी आणि भूमिपूजन करण्यासाठी रविवारी उदयनराजे भोसले यांनी शहरातून स्कूटरवर फेरी केल्यामुळे ते दिवसभर चर्चेत राहिले. कार्यकर्त्याची स्कूटर ताब्यात घेत त्यांनी राजपथासह शहराच्या विविध भागांतील विकासकामांची उद्घाटने व पाहणी केली. यावरून आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी टीका केल्यानंतर आता उदयनराजेंनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे.

यासंदर्भात प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया देत उदयनराजे म्हणाले की,’मला चारचाकी परवडत नाही. मी दुचाकीवरुन फिरेन, चालत फिरेन, रांगत फिरेन, माझे गुडघे दुखतात हवं तर मी लोळत फिरेन, गडगडत जाईन. कोणाला काय समस्या आहे? त्याबद्दल कोणाला दुख: वाटत असेल तर तुम्हीही तसं करा. लोकशाही आहे.’ तसेच ‘जनतेला कामं हवी आहेत. ती करायची नाहीत आणि आणि मग टीका करायची. नावं ठेवायला अक्कल लागत नाही. पण कॉमन सेन्स फारशी कॉमन नाही आहे. संबंधित लोकं जी नावं ठेवतात मला त्यांनी हिंमत असेल तर समोरासमोर या ना तेव्हा पूर्वनियोजित कार्यक्रम होते असं सांगतात. माझा फक्त एकच पूर्वनियोजित कार्यक्रम असतो तो म्हणजे जनतेची सेवा’ असेही ते म्हणाले.

दरम्यान, ‘उदयनराजेंनी दुचाकी चालवण्यापेक्षा पाच वर्षे साताऱ्याची नगरपालिका व्यवस्थित चालवली असती तर एवढी पोस्टरबाजी करण्याची वेळ आली नसती. पोस्टरबाजीवर खर्च करण्यापेक्षा साताऱ्याच्या विकासकामांवर खर्च केला असता तर बरं झालं असतं’ अशी टीका शिवेंद्रराजेंनी केली होती.

महत्त्वाच्या बातम्या