fbpx

साताऱ्यातून उदयनराजेंना पुन्हा संधी मिळणार, की लढणार शरद पवार !

टीम महाराष्ट्र देशा – आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातारा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या उमेदवारीचा सस्पेंस वाढू लागला आहे. साताऱ्यातून खा. शरद पवार यांनी लढावे असा आग्रह रामराजे यांनी केल्यानंतर पुन्हा विद्यमान खासदार उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह उभा राहिले आहे.

तर दुसरीकडे साताऱ्यातून पवारांनी नकार दिलाच तर दहा वर्ष खासदार व माजी राज्यपाल राहिलेले श्रीनिवास पाटील यांचा प्राधान्याने विचार करण्याची मागणी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केल्याची माहिती मिळत आहे.

श्रीनिवास पाटील यांचा दांडगा जनसंपर्क आणि मनमिळावू स्वभाव या बलस्थानांमुळे पाटील यांच्या नावावर एकमत होण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे कराड व पाटण तालुक्‍यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले आहे.

सातारा लोकसभा मतदारसंघ १९९९ पासून आजपर्यंत राष्ट्रवादीचा अभेद्य बालेकिल्ला राहिला आहे. सातारा लोकसभेसाठी पाटील यांना उमेदवारी देण्यात यावी, असा आग्रह अनेकांनी धरला आहे. त्यामुळे माढा लोकसभा मतदार संघाप्रमाणे सातारा लोकसभेचा तिढा वाढला आहे.

या मतदार संघातून शरद पवार उभे राहिले किंवा राष्ट्रवादीने श्रीनिवास पाटील यांना उमेदवारी दिली तर साताऱ्याचे विद्यमान खासदार उदयनराजे भोसले काय भूमिका घेणार हे मात्र पाहण्यासारखे आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उदयनराजे यांची मैत्री दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. उदयनराजे हे भाजपमध्ये जाणार अशीसुद्धा चर्चा ऐकायला मिळत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने श्रीनिवास पाटील यांना उमेदवारी दिली तर उदयनराजे भाजपमधून उभे राहणार असल्याची चर्चा सध्या मतदार संघात जोरात आहे.

उदयनराजे यांनी भाजपमध्ये प्रवेश करणे हे राष्ट्रवादीला परवडणारे नाही, कारण उदयनराजेंचा साताऱ्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात चाहता वर्ग आहे. त्याचा फटका राष्ट्रवादीला बसल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार ऐनवेळी काय निर्णय घेणार हे मात्र पाहण्यासारखे असणार आहे. ऐनवेळी उमेदवारी जाहीर करण्याचे धोरण पवारांकडून राबविले जाणार हे निश्‍चित आहे.

2 Comments

Click here to post a comment