पुण्यातील वादग्रस्त जमिनीवर उदयनराजेंनी सांगितला मालकी हक्क

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी पुण्यातील येरवडा भागातील ७९ एकर वादग्रस्त जमीन आपली वडिलोपार्जित असून, या जमिनीची मालकी आपल्या नावे करावी अशी मागणी पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांसमोर केली आहे.

पुण्यातील ७९ एकर वादग्रस्त जमीन सध्या शरद पवार यांच्या जवळचे समजले जाणारे अतुल चोरडिया, शाहिद बलवा यांच्या नावे आहे. आता यात उदयनराजे भोसले यांनी सुद्धा आपला मालकी हक्क सांगितला आहे.

काय आहे प्रकरण?

साताऱ्याचे शाहू महाराज यांनी इनाम म्हणून दिलेल्या जमिनीवर आता आलिशान इमारती आणि आयटी पार्क उभी आहेत. या जमिनीचा वाद वर्षानुवर्षे पुण्याचे जिल्हाधिकारी आणि आणि न्यायालय यांच्यासमोर सुरु आहे. या जमिनीचा बहुतांश भाग हा शरद पवार यांच्या जवळचे समजले जाणारे अतुल चोरडिया, शाहिद बलवा आणि काही बांधकाम व्यवसायिकांनी विकत घेतला आहे.

अतुल चोरडिया यांच्या पंचशील टेक पार्क या कंपनीच्या संचालक मंडळावर सुप्रिया सुळे २००३ ते २००९ पर्यंत होत्या. मात्र आता खासदार उदयनराजे भोसलेंनी ही जमीन आपली वडिलोपार्जित असून, या जमिनीची मालकी आपल्या नावे करावी अशी मागणी पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांसमोर केली आहे. त्यासाठी बोलावण्यात आलेल्या सुनावणीला उदयनराजे पुण्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्यासमोर उपस्थितीतही राहिले. या प्रकरणाबत दाखल खटल्यावर ५ मार्चला मुंबई उच्च न्यायालय अंतिम निकाल देणार आहे.