कोरोनामुळे अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्याही परीक्षा रद्द करून ग्रेड प्रदान करा : उदय सामंत

udya samant

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अलीकडेच उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी अंतिम वर्ष वगळता इतर सर्व वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याची घोषणा केली होती. तर आता उद्य सामंत यांनी पुन्हा युजीसीला अंतिम वर्षाची परीक्षा घेण्याचे शक्य नसल्याचे सांगत या परीक्षा देखील रद्द करा, अशी मागणी केली आहे.

संपूर्ण राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना आम्हाला अंतिम वर्षातील अंतिम सत्रातील परीक्षा घेणं शक्य होणार नाही. असा निर्णय घेतलाच तर, कोरोनाची वाढती संख्या पाहता विद्यार्थ्यांपुढे आणखी एक संकट असेल. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनावर असणारं दडपण, ताण पाहता परीक्षा रद्द करण्यात यावी अशी विचारणा युजीसीकडे केल्याची माहिती सामंत यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून दिली.

तसेच शिवाय विद्यार्थ्यांचं कोणत्याही प्रकारे नुकसान होणार नाही, अशा प्रकारती गुणवत्ता प्रक्रिया अंमलात आणावी, यासाठी आम्ही प्रयत्नशील असू असंही ते म्हणाले. राज्यातील जवळपास १० लाख विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करता अंतिम परीक्षा न घेता त्यांना विद्यापीठ आयोगाच्या अनुदानाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार ग्रेड प्रदान करण्याच्या पर्यायाला युजीसीनं मान्यता द्यावी असं विनंतीपर पत्र सामंत यांनी लिहिलं.

दरम्यान सामंत यांच्या या निर्णयांनंतर अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचं आणि तणावाचं वातावरण पाहायला मिळालं. खुद्द पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही विद्यार्थ्यांची बाजू उचलून धरली. ज्यानंतर आता महाराष्ट्र राज्यातून उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून एक पत्र लिहिण्यात आलं आहे. ज्यामध्ये त्यांनी अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द करण्याची मागणी केली आहे.