सत्ताधारी आणि विरोधी पक्ष लोकशाहीची दोन चाके – धनंजय मुंडे

नागपूर : संसदीय लोकशाहीमध्ये विधिमंडळाला महत्त्वाचे स्थान आहे. विधिमंडळात जनतेच्या हिताचे निर्णय, कायदे हे सत्ताधारी व विरोधी पक्ष यांनी घडवून आणलेल्या सकारात्मक चर्चेतून होत असतात. लोकशाहीमध्ये सत्तारुढ व विरोधी पक्ष एकाच गाडीचे दोन चाके असल्याचे प्रतिपादन विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केले.

विधिमंडळाच्या राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या वतीने राज्यातील राज्यशास्त्र आणि लोकप्रशासन या विषयाचा अभ्यास करणाऱ्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या संसदीय अभ्यासवर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत ‘संसदीय लोकशाहीत सत्तारुढ आणि विरोधी पक्षाचे स्थान, कर्तव्य आणि विधिमंडळातील भूमिका’ या विषयावर मुंडे बोलत होते. यावेळी आमदार विनायक मेटे, अवर सचिव सुनील झोरे राज्यातील विद्यापीठातील अधिव्याख्याते, विद्यार्थी उपस्थित होते.

मुंडे म्हणाले की, संसदीय लोकशाहीमध्ये सत्ताधारी व विरोधी पक्ष यांनी एकत्र लोकाभिमुख काम केल्यास त्याचे स्वागत केले जाते. संसदीय आयुधाच्या माध्यमातून सभागृहामध्ये विरोधी पक्ष सत्तारुढ पक्षाला चुकीचे निर्णय होत असेल तर धारेवर धरतो. सरकारने आणलेल्या योजना, निर्णय यावर त्रुटी दाखवून दुरुस्त करण्यास भाग पाडले जाते. काही वेळेस अधिवेशन काळात सत्तारुढ पक्षाला सरकारी कामकाज पार पाडावे लागते. पुरवणी मागण्या मंजूर करुन घ्याव्या लागतात. त्यासाठी विरोधी पक्षांचे सहकार्य महत्त्वाचे ठरते. विधेयक जनतेच्या हिताचे नसेल तर विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांना निर्णय माघारी घ्यायला भाग पाडतो. सभागृहामध्ये सत्ताधाऱ्यांनी दिलेले आश्वासन खोटे ठरत असेल तर त्यावर आवाज उठवून सभागृह बंद पाडण्याचा विरोधकांना हक्क आहे.

सभागृहाचे कामकाज सुरळीत चालण्यासाठी सत्ताधाऱ्यांबरोबर विरोधी पक्षांची तेवढीच जबाबदारी आहे. तसेच जेवढे महत्त्व विधानसभेला आहे, तेवढेच विधान परिषदेला आहे. काही वेळा विनियोजन बिल संसदीय आयुधाच्या माध्यमातून विरोधी पक्षांनी नामंजूर केल्यास अधिवेशन कालावधी वाढवला जाऊ शकतो. आपत्तीच्या किंवा महाभयंकर संकटाच्या वेळी जनतेच्या हितासाठी विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांना चांगला निर्णय घेण्यास मदत करतो. लोकशाहीला सुदृढ व मजबूत करण्यासाठी विधिमंडळ संसदीय आयुधाच्या माध्यमातून चालायला हवे, असेही मुंडे यांनी सांगितले.

मुंडे यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली. विधिमंडळाचे प्रधान सचिव डॉ.अनंत कळसे यांनी प्रास्ताविक केले तर आभार गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीचा विद्यार्थी अक्षय वासनिक याने मानले.

Rohan Deshmukh

बोंडअळीच्या नुकसान भरपाईचे जाहीर केलेले ३७ हजार ५०० रूपये कधी देणार ते सांगा ?- मुंडे

सरकार मराठा समाजाची शुद्ध फसवणूक करत आहे – धनंजय मुंढे

फडणवीस, कृषिमंत्र्यावर खुनाचा गुन्हा दाखल करणार का?- धनंजय मुंडे

Latur Advt
You might also like
Comments
Loading...