दोन आत्मसमर्पित नक्षली जोडप्यांसह तब्बल ९७ आदिवासी जोडपी विवाहबद्ध

गडचिरोली : नक्षलवाद्यांचा खात्मा केल्यामुळे गेल्या आठवड्यात गडचिरोली जिल्हा चर्चेत होता आता एका सकारात्मक गोष्टीमुळे चर्चेत आहे. गडचिरोली मध्ये दोन आत्मसमर्पित नक्षली जोडप्यांसह तब्बल ९७ आदिवासी जोडपी सामूहिक विवाह सोहळ्यात विवाहबद्ध झाली आहेत. पोलीस प्रशासन, मैत्री परिवार संस्था नागपूर, धर्मदाय आयुक्त नागपूर आणि साईभक्त साईसेवक परिवार, नागपूर यांच्या संयुक्त पुढाकारानं हा अनोखा सोहळा गडचिरोलीत पार पडला.

नक्षल चळवळीतून बाहेर आल्यानंतरच आमच्या जीवनाला खरी सुरूवात झाली असून चळवळीतील जीवनापेक्षा बाहेरचे जीवन कितीतरी चांगले आहे, अशी भावना नक्षल चळवळीतून बाहेर येऊन आत्मसमर्पण केलेले दीपक आणि छाया तसेच रैनू आणि रूची या पूर्वाश्रमीच्या नक्षलींनी व्यक्त केली. यावेळी जिल्ह्याचे खासदार अशोक नेते, जिल्हाधिकारी शेखर सिंग, पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, नगराध्यक्ष योगिता पिपरे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार, मैत्री परिवार संस्थेचे अध्यक्ष प्रा.संजय भेंडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

असा रंगला विवाह सोहळा
भुमकांनी (आदिवासी पुजारी) विधिवत हा समारंभ पार पाडला. भव्य अशा शामियान्यात पोलीस उपविभागनिहाय वेगवेगळे कप्पे तयार करून जोडप्यांना बसविण्यात आलं होतं. प्रत्येक कप्प्यात मोहाच्या झाडाच्या साक्षीनं पाच दिव्यांभोवती सात फेरे घेऊन आदिवासी भाषेत मंगलाष्टकं झाली. प्रत्येक मंगलाष्टकानंतर जोडप्यांवर अक्षतांऐवजी फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव केला जात होता. वऱ्हाड्यांच्या जेवणापासून तर सोहळ्याचे सर्व सोपस्कार पार पाडण्यासाठी अतिशय शिस्तबद्ध नियोजन केलं होतं. या सोहळ्यानंतर गडचिरोली शहराच्या मुख्य रस्त्यावरून ३० ट्रॅक्टरमधून नवदाम्पत्याची फेरवरात काढण्यात आली.