सोन्याची तस्करी करणाऱ्या दोन बहिणींना अटक

पुणे : जयपुरी प्लॅस्टिक बांगड्यांमधून तस्करीद्वारे 22 लाख रुपयाचे सोने आणलेल्या दोन बहिणींना सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केले आहे. पुणे आंतराष्ट्रीय विमानतळावर ही कारवाई करण्यात आली. आपल्यातील एखादी पकडली, तर दुसरी वाचावी यासाठी या दोघी वेगवेगळ्या विमानाने आल्या होत्या.तपासणीत त्यांच्याकडून दोन किलो केशरही जप्त करण्यात आले.

यावेळी सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केलेल्या दोन्ही बहिणींकडून 21 लाख 76 हजार 502 रुपयांचे सोने आणि दोन किलो केशर जप्त केले आहे. विमानतळावरील अधिकाऱ्यांकडून प्रवाशांच्या साहित्य तपासणी सुरू असताना हा प्रकार समोर आला. तपासणीदरम्यान त्यांच्या हातातील बांगड्या जड वाटल्याने अधिकाऱ्यांना शंका निर्माण झाली.त्यानंतर याची व्यवस्थित पाहणी केल्यावर आतमध्ये सोन्याच्या रिंग आढळून आल्या.

दोघींकडे प्रत्येकी 4 बांगड्यामधून एकूण 699.84 ग्रॅम सोने जप्त करण्यात आले. त्याची बाजारातील किंमत 21 लाख 76 हजार 502 रुपये आहे. यासंदर्भात सीमा शुल्क विभागाचे अधिकारी तपास करत आहेत