स्पेनमध्ये दोन ठिकाणी दहशतवादी हल्ले; १३ ठार, १०० जखमी

बार्सिलोना : स्पेनमधील बार्सिलोना शहरात  झालेल्या दहशतवादी हल्ल्यात १३ ठार तर, १०० हून अधिक जण जखमी झाले आहेत. बार्सिलोनामधील सिटी सेंटरमध्ये वर्दळीच्या ठिकाणी भरधाव व्हॅन जमावात घुसून दहशतवाद्यांनी लोकांना चिरडले. लास रामब्लास या भागात हा हल्ला झाला आहे. ‘इसिस’ने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. मृतांच्या आणि जखमींच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जखमी झालेल्यांपैकी १० जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती क्षेत्रीय गृहमंत्री जोआक्विम फोर्न यांनी दिली.  तर, दुसरा हल्ला कॅम्ब्रिल्समध्ये झाला. कॅम्ब्रिल्समध्ये दहशतवाद्यांनी गोळीबार केला असून या गोळीबाराला पोलीसांनी चोख प्रत्युत्तर देत ४ दहशतवाद्यांना ठार केले. एका जखमी दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे. या हल्ल्यात एका पोलीस कर्मचा-यासह ७ जण जखमी झाले आहेत.