‘सरकारमधील दोन आणि सरकारबाहेरील दोन लोकं मिळूनच सर्वकाही निर्णय घेत आहेत’

नवी दिल्ली : जवळपास तीन महिने उलटून देखील शेतकरी व केंद्र सरकार यांच्यातील कोंडी कायम आहे. विरोधकांनी यावरून सरकारला घेरल्याचं दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारवर होणाऱ्या आरोपांचा खंडन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत केलं होतं.

कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनीही याला प्रत्युत्तर देताना ‘उद्योगपतींचं कर्ज माफ केलं, आता हा देश रोजगार निर्मिती करु शकत नाही, कारण देशाचा कणा तुम्ही मोडीत काढला, हे शेतकऱ्यांचं नाही देशाचं आंदोलन, शेतकरी तर फक्त मार्ग दाखवतोय, संपूर्ण देश ‘हम दो हमारे दो’च्या विरोधात आवाज उठवतोय’, असं म्हणत राहुल गांधी यांनी गृहमंत्री अमित शाह व पंतप्रधान नरेंद्र मोदींसह उद्योगपती मुकेश अंबानी आणि गौतम अदाणींवर निशाणा साधला होता.

दरम्यान, राहुल गांधी यांनी पुन्हा याच मुद्द्यावर भाष्य केले आहे. ‘माझ्या संसदेतील भाषणात मी हिंदीत म्हटलो होतो, हम दो हमारे दो. म्हणजे सरकारमधील दोन आणि सरकारबाहेरील दोन लोकं मिळूनच सर्वकाही निर्णय घेत आहेत’, अशा शब्दात राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अंबानी व अदानी यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

राहुल गांधी केरळमधील ‘वायनाड’ दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे. ‘जगभराने दिल्लीतील शेतकरी आंदोलनाची दखल घेतली. मात्र, दिल्लीतील केंद्र सरकारला अद्यापही शेतकऱ्यांच्या आंदोलनाची दखल घ्यावी वाटत नाही. शेती हा एकमेव शेतकऱ्यांचाच उद्योग-व्यवसाय आहे.

भारत मातेशी संबंधित उद्योग आहे, इतर प्रत्येक व्यवसाय हे इतरांशी निगडीत असतात. पण, शेती या उद्योगावरही आपलं वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न काही लोकांकडून होत आहे. या दोन ते तीन लोकांसाठीच केंद्र सरकारने ३ शेतकरी कायदे केले आहेत, असंही राहुल गांधी यांनी म्हंटलंय.

महत्त्वाच्या बातम्या