fbpx

मुंबईत पावसाचे थैमान ; कारमध्ये पाणी शिरल्याने गुदमरून दोघांचा मृत्यू

मुंबई : मुसळधार पावसामुळे मालाड पूर्व परिसरात असलेल्या पिंपरीपाडा येथील झोपडपट्टीवर भिंत कोसळली. या दुर्घटनेत आतापर्यंत १९ जणांचा मृत्यू झाला असून ६० हून अधिक जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच, अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

तर दुसऱ्या बाजूला पावसाच्या हाहाकारामुळे आणखी दोघांचा बळी गेला आहे. मालाड सब-वेमध्ये पाणी भरल्याने सब-वेमधील कारमध्ये अडकलेल्या दोन तरुणांचा गुदमरून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटनासमोर आली आहे. सोमवारी रात्री ही दुर्घटना घडली असल्याचे सांगितले जात आहे. काल संध्याकाळी पावसाने जोर धरल्याने मालाडच्या सब-वेमध्ये पाणी भरले होते. यातच कारच्या चारही बाजूने पाणी भरल्याने कारमध्ये असलेले इरफान खान आणि गुलशाद शेख कारमध्येच अडकले. पाण्याच्या प्रवाहाने कारची काच फुटली आणि कारमध्ये पाणी शिरल्याने या दोघांचाही गुदमरून मृत्यू झाला.

रात्रीचा अंधार असल्यानं ही कार कुणालाही दिसली नाही. पहाटे ४ वाजता हा प्रकार उघड झाल्यावर अग्निशमन दलाच्या सहाय्याने कारमधून दोघांचेही मृतदेह बाहेर काढण्यात आले. त्यानंतर शवविच्छेदनासाठी शताब्दी रुग्णालयात त्यांचे मृतदेह नेण्यात आले. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.