fbpx

पाककडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन; दोन जवान शहीद

जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले असून,पाककडून करण्यात आलेल्या गोळीबारात भारतीय सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) दोन जवान शहीद झाले आहेत. काही दिवसांपासून प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानकडून सतत शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात येत आहे. गेल्या आठवड्यात जम्मू-काश्मीरमधील सांबा सेक्टर परिसरात पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात बीएसएफचा एक जवान शहीद झाला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, येथील अखनूर आंतरराष्ट्रीय सीमाभागात पाकिस्तानच्या रेंजर्सकडून शनिवारी रात्री उशिरा भारतीय चौक्यांवर जोरदार गोळीबार करण्यात आला. या गोळीबाराला भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिले. मात्र, या गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचे दोन जवान शहीद झाले.