दिल्लीत चार मजली इमारतीत भीषण आग ; २ लहान मुलांचा होरपळून मृत्यू

नवी दिल्ली : दिल्लीतील शाहीन बाग भागामध्ये इमारतीच्या पहिल्या मजल्यावर आज भीषण आग लागली. या आगीच्या कचाट्यात सापडून दुर्दैवाने दोन मुलांचा होरपळून मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,दिल्लीतील शाहीन बाग भागामध्ये इमारतीच्या पहिल्या मजल्यावर दुपारी दीड च्या सुमारास आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे हि आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. लागलेली ही भीषण आग दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यापर्यंत पोहचली होती. हि आग इतकी भीषण होती की आगीमध्ये दोन मुलं होरपळली. त्यांना बाहेर काढून जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दुर्दैवाने उपचारादरम्यान दोन्ही मुलांचा मृत्यू झाला. यामध्ये मुलगा ६ वर्षांचा तर एक मुलगी ७ वर्षांची होती.