fbpx

धक्कादायक : ‘कोंबिंग’ ऑपरेशन करताना दोन तडीपार गुन्हेगार पकडले

अहमदनगर/प्रशांत झावरे : अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथे केडगाव, जामखेड येथे झालेल्या दुहेरी हत्याकांडानंतर व पाथर्डी येथे झालेल्या गोळीबारानंतर पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन करताना दोन हद्दपार आरोपी पकडले असून एकाकडे धारदार कत्ती सापडली. पालिसांनी त्यांना अटक करुन प्रतिबंधात्मक कारवाई केली. पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलीस अधीक्षक रोहिदास पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक दौलतराव जाधव व पोलीस कर्मचार्यांनी 14 मे रोजी रात्री शहरात गस्त घालताना कोंबिंग ऑपरेशन केले.

कोंबिंग ऑपरेशन दरम्यान रेकॉर्डवरील शस्त्र बाळगणारे गुन्हेगार, फरार आरोपी, तडीपार गुन्हेगार, नॉन बेलेबल वॉरंट मधील गुन्हेगार चेक केले असता हद्दपार गुन्हेगार असलम उमर कुरेशी हा रात्रीच्या वेळी धारणगाव रोडवर पोस्ट ऑफिस समोर दडून बसताना दिसला. त्यास पोलिसांनी घेरून पकडले. आरोपीची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे १७.५ इंच लांबीची लोखंडी कत्ती हे धारदार शस्त्र आढळून आले.

या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. तसेच हद्दपार गुन्हेगार देवा उर्फ देविदास रंगनाथ लोखंडे याला पोलिसांनी पकडून त्याची अंगझडती घेतली असता काही मिळाले नाही. त्यास पोलिसांनी अटक केली आहे. दोन्ही आरोपींना प्रांताधिकार्यां नी अहमदनगर, नाशिक जिल्ह्यांतील सिन्नर, निफाड, येवला व औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातून दोन वर्षे हद्दपार केले आहे.