क्वारंटाइन सेंटरमधून दोन करोनाग्रस्त कैद्यांनी काढला पळ; शोध सुरू

quarantine

सांगली :  सांगलीतील कोव्हिड क्वारंटाइन सेंटरमधून दोन करोनाबाधित कैदी पळून गेल्याची घटना आज पहाटे घडली आहे. शहरातील लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या वसतिगृहात असलेल्या कोव्हिड सेंटरमध्ये हा प्रकार घडला आहे. विश्रामबाग पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राजू कोळी आणि रोहित जगदाळे हे दोघेही रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहेत.

२३ ऑगस्ट रोजी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास या दोघांनी कोल्हापूर रोड परिसरात सातारा जिल्ह्यातील ट्रक चालकाला कोयत्याचा धाक दाखवून ४७ हजार रुपयांची रोकड आणि मोबाइल लुटला होता. या प्रकरणात शहर पोलिस ठाण्याच्या पथकाने दोघांना १७ सप्टेंबर रोजी अटक केली. कोर्टात हजर केले असता, त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली होती. यानंतर त्यांची करोना चाचणी घेतल्यानंतर दोघांचेही अहवाल पॉझिटिव्ह आले. यांना उपचारासाठी शहरातील लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या संस्थेत निर्माण केलेल्या कोव्हिड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. या सेंटरमध्ये एकूण दहा कैदी उपचारासाठी दाखल होते.

कोळी आणि जगदाळे यांनी रविवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास बंदोबस्तावरील पोलिस आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची नजर चुकवून कोव्हिड सेंटरमधून पळ काढला. खिडकीच्या काचा फोडून आणि लोखंडी गज वाकवून कैदी पळाल्याचे पोलिसांच्या निदर्शनास येताच त्यांनी कोव्हिड सेंटर परिसरात शोध घेतला. या घटनेची माहिती मिळताच कारागृह अधीक्षक सुशील कुंभार यांनी तातडीने कोव्हिड सेंटरकडे धाव घेऊन पाहणी केली. पळालेल्या कैद्यांच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत. तसेच शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. करोनाबाधित कैदी पळाल्याने जिल्ह्यात खळबळ निर्माण झाली आहे. याप्रकरणी अधीक्षक सुशील कुंभार यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

कोल्हापुरात रुग्णसंख्या घटली

कोल्हापूर जिल्ह्यात जूनपर्यंत करोनाचा कहर फारसा नव्हता. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात करोनाने हाहाकार उडवला. या दोन महिन्यात जवळजवळ तीस हजारांवर बाधित आढळले. मृतांचा आकडा हजारांवर पोहोचला. यामुळे जिल्ह्यात प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेची धावपळ उडाली. आठ दिवस मात्र जिल्ह्यात करोनाचा आकडा कमी होत आहे. पूर्वी रोज एक हजारावर बाधित आढळत होते. हा आकडा ५० टक्क्यांनी घटला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत करोनाबाधित रुग्णांचा आकडा ४३ हजारांवर पोहोचला आहे.

प्रशासनाने सुरू केलेली दंडात्मक कारवाई, जनजागृती, लोकांनीच घालून घेतलेली स्वयंशिस्त यामुळे हा आकडा कमी होत असल्याचे दिसत आहे. आत्तापर्यंत १३५४ जणांचा करोनाने बळी घेतला असून ३१ हजार ४७२ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या ९६११ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

महत्वाच्या बातम्या :-