fbpx

गुरांची अवैध वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक

रत्नागिरी : गुरांची अवैध वाहतूक करणा-या दोघांना खेड शहर परिसरातून ताब्यात घेण्यात आले आहे. ही घटना काल (दि. २३ ऑगस्ट) पहाटे पावणेचार वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खेड परिसरातील बंदर रोड या ठिकाणी एका मालवाहू जीप (क्र. एमएच ४३ एडी ४७४७) मधून पाच बैलांची अवैधरीत्या वाहतूक करण्यात येत होती.

पहाटे गस्त घालणा-या पोलिसांच्या पथकाला ही जीप बंदर रोड परिसरातून जात असताना दिसली. पोलिसांनी जीपमध्ये बसलेल्या दोघांना हटकले. त्यानंतर त्या जीपची पाहणी केली असता त्यामध्ये पाच बैल बांधलेले दिसले. या प्रकरणी खेड पोलिसांनी जीपसह मंगेश पालशेतकर (रा. भरणे) व मंगेश पवार (रा. दापोली) यांना ताब्यात घेतले आहे.