ट्विटरवर ट्रेंड #GoBackModi

टीम महाराष्ट्र देशा – पंतप्रधान मोदी यांना दक्षिणेतील जनतेच्या रोषाला चांगलेच सामोरे जावे लागले. मोदी हे मदुराईतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स (एम्स)चे अनावरण करण्यासाठी करण्यास गेले होते. यावेळी दक्षिणेतील जनतेने #GoBackModi म्हणजेच मोदी परत जा हा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंडिंग होत केला. केवळ ट्विटरवरच नव्हे तर मोदींच्या आगमनानंतर त्यांच्याविरोधात काळे झेंडे दाखवून त्यांच्या विरोधात प्रदर्शन देखील केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दक्षिणेकडील राज्यांकडे दुर्लक्ष होत असल्यावरून केंद्र सरकारविरोधात हा असंतोष उगाळून येत आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी गाजा चक्रीवादळाने तमिळनाडूमध्ये धुमाकूळ घातला होता . यानंतरही मोदींनी या भागाला भेट दिली नव्हती. त्यामुळे येथील लोकांच्या मनात मोदी विषयी राग आहे.

त्यातच तुतीकोरीन येथील स्टेरलाईट प्रकल्पाविरोधात गेल्या वर्षी आंदोलन करणाऱ्यांवर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात १३ जणांचा मृत्यू झाला होता. पंतप्रधान मोदींनी या प्रकरणावर बाळगलेले मौनही लोकांना खटकले होते. कर्नाटक आणि तमिळनाडूत कावेरी नदीच्या पाणीवाटपावरून सुरु असलेल्या वादात केंद्र सरकारने कर्नाटकचीच बाजू घेतल्याची खदखदही तामिळनाडू जनतेत आहे. मोदींच्या दौऱ्यानिमित्ताने हा असंतोष ट्विटरच्या माध्यमातून बाहेर पडलेला दिसून आला आहे.

मदुराईत एम्स उभारण्याचे आश्वासन मोदींनी चार वर्षांपूर्वी दिले होते. आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर येताच एम्सचे उद्घाटन करण्यात आल्याचा आरोप सरकारवर केला जात आहे.