औरंगाबादेत बारावी पुरवणी परीक्षेला सुरुवात; ३९ केंद्रावर १३०० विद्यार्थी देताहेत परीक्षा!

exam

औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या वतीने घेण्यात येणारी बारावीची पुरवणी परीक्षा आजपासून सुरू झाली. औरंगाबाद विभागातील एकूण ३९ परीक्षा केंद्रावर परीक्षा घेण्यात येत असल्याची माहिती बोर्डाच्या वतीने देण्यात आली.

कोरोनामुळे यंदा नियमितपणे घेण्यात येणारी बारावीची परीक्षा रद्द करण्यात आली होती. परीक्षा रद्द करून मूल्यांकन करून यंदा बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला. त्यातही अनेक विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये यासाठी दरवर्षी प्रमाणे यंदाही बारावीची पुरवणी परीक्षा घेण्यात येत आहे. त्यात बारावीच्या निकालात ज्या विद्यार्थ्यानी आक्षेप नोंदविला होता, अशा विद्यार्थ्यांसाठी पुरवणी परीक्षा घेण्यात येत आहे. आजपासून सुरू झालेल्या पुरवणी परीक्षेत विभागातून १ हजार ३०० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. गुरुवारी सकाळी ११ वाजता पहिला पेपर सुरू झाला.

विद्यार्थ्यांना सकाळी १० वाजून ३० मिनिटाने परीक्षा केंद्रात प्रवेश देण्यात आला. एका वर्गात काही केंद्रावर १२ विद्यार्थ्यांना तर काही ठिकाणी एका वर्गात २४ विद्यार्थ्यांची व्यवस्था करण्यात आली. विद्यार्थ्यांची तपासणी करूनच विद्यार्थ्यांना केंद्रात सोडण्यात आले. तसेच परीक्षा केंद्रावर तत्पूर्वी मास्क आहे की नाही, थर्मल गनद्वारे तपासणी करण्यात आली. यावेळी पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आजपासून सुरू झालेली परीक्षा  ही ११ ऑक्टोबरपर्यंत घेण्यात येणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या