‘महाराष्ट्र बंद’ला पुण्यात हिंसक वळण, जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रवेशद्वार तोडले

पुणे : मराठा आरक्षणाच्या मागणीवर आज सकल मराठा समाजाकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे, या बंदला पुण्यामध्ये उस्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे. मात्र ठिय्या आंदोलन संपल्यानंतर या आंदोलनाला  हिंसक वळण लागल्याचं पहायला मिळालं. आंदोलकांनी घोषणाबाजी करत तोडफोड केल्याची माहिती समोर आली आहे.

आंदोलन शांततेत करावं असं आवाहन कालच करण्यात आलं होतं मात्र आचारसंहितेची अंमलबजावणी होताना दिसत नसल्याचे चित्र आहे. जमावाने जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रवेशद्वार तोडल्याची देखील माहिती समोर आली आहे.जिल्हाधिकाऱ्यांनी खाली येवून निवेदन स्वीकारावे या मागणीसाठी आंदोलकांनी हट्ट धरला होता. यावेळी माध्यमांच्या प्रतिनिधींना प्रक्षेपण करण्यापासून देखील रोखण्यात आलं.

आज पुण्यात मुख्य बाजापेठेसह उपनगरांतील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. दरम्यान, शहरातील सर्व समाज बांधवानी एकत्र येत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मागील 15 दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन करण्यात येत आहे. औरंगाबाद येथील मराठा युवक काकासाहेब शिंदे यांनी जलसमाधी घेतल्यानंतर हे आंदोलन अधिकच तीव्र झाले आहे. आज संपूर्ण महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. पुणे शहर आणि जिल्ह्यात कडकडीत बंद पाळला जात आहे.

‘महाराष्ट्र बंद’ डोणजे गावात ठिय्या आंदोलन