मतमोजणीवेळी देशातील सर्व मोबाईल टॉवर बंद करा : पडळकर

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकांचे निकाल २३ मे ला जाहीर होत आहेत. अशातच सांगली लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांनी एक अजब मागणी केली आहे.

वेगवेगळ्या प्रसारमाध्यमांनी जाहीर केलेल्या अंदाजानुसार भाजपला बहुमत मिळत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे विरोधकांकडून ईव्हीएमविषयी शंका उपस्थित केली जात आहे. गोपीचंद पडळकर यांनीही ‘लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीवेळी ईव्हीएम हॅक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मतमोजणी वेळी देशातील सर्व मोबाईल टॉवर बंद करण्यात यावे’ अशी मागणी केली आहे. पुढे बोलताना त्यांनी ‘५ किलोमीटर अंतरावरील मोबाईल टाॅवर बंद करण्यात यावे, नाहीतर मतदार यंत्रात घोळ होण्याची शक्यता आहे असं सांगलीत पत्रकारांशी बोलताना सांगितले.

दरम्यान, सांगली लोकसभा मतदारसंघात भाजपकडून विद्यमान खासदार संजय पाटील, स्वाभिमानीकडून विशाल पाटील तर वंचित बहुजन आघाडीकडून गोपीचंद पडळकर अशी तिरंगी लढत होत आह्रे.