तुळजाभवानी हाकेला धावली, मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिले ५० लाख रुपये

blank

टीम महाराष्ट्र देशा– उस्मानाबाद इथल्या तुळजाभवानी मंदिर संस्थानकडून सांगली आणि कोल्हापूर येथील पूरग्रस्तांना २५ लाख रुपये रोख रक्कम, २५ लाख रुपये किंमतीच्या वस्तू अशी एकूण ५० लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्यात येणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे यांनी दिली आहे. तसंच, हिंगोली जिल्ह्यात पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आज ठिकठिकाणी मदत फेरी काढण्यात आली. आखाडा बाळापूर इथं विविध शैक्षणिक आणि सामाजिक संस्थांनी फेरी काढून मदत जमा केल्याची माहिती आमच्या वार्ताहरानं दिली आहे.

सांगली आणि कोल्हापूरसह राज्याच्या अन्य भागातल्या पुराच्या पार्श्वभूमीवर पुरग्रस्तांच्या मदतीसाठी अनेक हात पुढे येत आहे. शिर्डीतल्या साईबाबा न्यासानं पूरग्रस्तांना दहा कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे.

अंबाजोगाई शहरातूनही काल पूरग्रस्तांसाठी मदत फेरी काढण्यात आली. औरंगाबाद शहरातही क्रांतीचौक परिसरात काल सामाजिक संघटनांनी पूरग्रस्तांसाठी मदत संकलित केली.

पूरग्रस्तांना मदत म्हणून एका महिन्याचं मानधन देण्याचा निर्णय मुंबईतल्या शिवसेनेच्या नगरसेवकांनी घेतला आहे, काँग्रेसचे आमदार आणि खासदार एका महिन्याचं वेतन पूरग्रस्तांसाठी देणार आहेत.महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी संघानं एका दिवसाचा पगार मुख्यमंत्री मदत निधीला देणार असल्याचं सांगितलं आहे.

अहमदनगर जिल्ह्यात विविध संघटना पक्ष यांच्याकडून पूरग्रस्तांना मदत गोळा करण्याचे सुरू आहे . शिर्डी शहरातूनही पोलिस विभाग, विमानतळ कर्मचारी तसंच शिर्डी शहर परिसरातले नागरिकही या अभियानात सहभागी झाले आहेत.