Tukaram Mundhe | मुंबई : आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांची पुन्हा बदली करण्यात आली आहे. शासनाने त्यांना कार्यमुक्त होण्याचे आदेश दिले आहेत. अद्याप नवीन पद देण्यात आलेले नाही. आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची कुटुंब कल्याण विभागाच्या संचालक पदावरून बदली करण्यात आली आहे. विशेष म्हणजे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची बदली हा विक्रम ठरला आहे. तुकाराम मुंढे यांची 16 वर्षात आतापर्यंत 19 वेळा बदली झाली आहे. तुकाराम मुंढे यांची दोन महिन्यांपूर्वी बदली झाली होती. या दोन महिन्यांत मुंढे यांनी आरोग्य विभागात शिस्त आणण्याचा प्रयत्न केला. तुकाराम मुंढे हे राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे प्रभारी होते. दोन महिन्यातच त्यांची पुन्हा बदली झाली.
तुकाराम मुंढे हे शिस्तप्रिय अधिकारी म्हणून चर्चेत आहेत. ते कोणत्याही राजकीय दबावाला बळी पडत नाहीत. याचे फळे त्यांना बदलीच्या स्वरुपात मिळते. ऑन द स्पॉट काम करणारे अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांना देखील ते शिस्तीचे धडे देतात. त्यामुळे त्यांचा दबदबा असतो. शिस्त आणण्यासाठी आणि गोंधळलेल्या परिस्थितीला पुन्हा रुळावर आणण्यासाठी त्यांनी उचललेली पावले त्यांच्या बदलीचे कारण बनतात. महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील ताडसोना येथे 3 जून 1975 रोजी जन्मलेले तुकाराम मुंढे हे 2005 च्या बॅचचे आयएएस आहेत.
राजकीय दबाव –
तुकाराम मुंढे यांच्या बदलीचे प्रकरण वेळोवेळी समोर येत आहे. प्रत्येक मुद्द्यावर एकमेकांच्या विरोधात जाणारे पक्ष आणि विरोधक एक होतात. पण तुकाराम मुंढेंच्या कार्यशैलित कधीच बदल झाला नाही. यामुळे सर्वसामान्य जनतेत त्यांचे कामाची चर्चा असते. मुंढे ऑगस्ट 2005 मध्ये प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी म्हणून सोलापुरात होते. सप्टेंबर 2007 मध्ये उपजिल्हाधिकारी झाल्यानंतर त्यांची देगलूर उपविभागात रवानगी करण्यात आली. त्यानंतर जानेवारी 2008 मध्ये ते नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी झाले. मार्च 2009 मध्ये ते आदिवासी विभागाचे आयुक्त झाले. जुलै 2009 मध्ये वाशिमचे मुख्य कार्यकारी अधिकारी बनले. जून 2010 मध्ये कल्याणचे मुख्य कार्यकारी अधिकारी बनले. जून 2011 मध्ये जालन्याचे जिल्हाधिकारी झाले. त्यानंतर ते सप्टेंबर 2012 मध्ये ते मुंबईतील विक्रीकर विभागाचे सहायक आयुक्त झाले. यानंतर तुकाराम मुंढे कार्यशैली चांगलीच चर्चेत आली. कारण 2014 मध्ये देशात, राज्यात सत्ताबदल झाला. भाजपचे सरकार राज्यात आले. या सरकारने नेतृत्व देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आले होते.
फडणवीस सरकारमध्ये देखील बदलीचे सत्र –
फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर तुकाराम मुंढे यांची बदली नोव्हेंबर 2014 मध्ये सोलापूरचे जिल्हाधिकारी म्हणून करण्यात आली. मे 2016 मध्ये ते नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त झाले. नवी मुंबईत ते अवैध बांधकामांवरील कारवाईमुळे चांगलेच चर्चेत आले होते. वाढत्या राजकीय दबावानंतर मुंढे यांची पुण्यात पीएमपीएमएमलच्या अध्यक्षपदी बदली करण्यात आली होती. मार्च 2017 मध्ये ते पीएमपीएल पुण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी बनले. पुण्यात त्यांचे नाव चांगलेच चर्चेत आहे. अनेक अधिकारी, राजकीय नेते त्रस्त झाले होते. पीएमपीएला शिस्तीत आणण्यासाठी मुंढे कठोर निर्णय घेत होते. त्यांच्याविरोधात अनेक राजकीय आंदोलन देखील करण्यात आले होते. याचा परिणाम मताधिक्यावर होईल म्हणून भाजपने त्यांना ११ महिन्याच्या कालावधीत फेब्रुवारी 2018 मध्ये त्यांना नाशिक महापालिकेत आयुक्त केले.
नाशिकमध्ये सत्ताधारी आणि मुंढे यांच्यात झाला होता तीव्र संघर्ष –
नाशिक महापालिकेत असताना मुंढे विरुद्ध नगरसेवक असा सामना चांगलाच रंगला होता. धडाकेबाज कामगिरीमुळे सत्ताधारी आणि मुंढे यांच्यात संघर्ष तीव्र झाला होता. सामान्य नाशिककर मात्र सातत्याने मुंढे यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिले होते. मात्र राजकीय ताकदीपुढे नाशिककर हारले. नोव्हेंबर 2018 मध्ये त्यांना मुंबईतील नियोजन विभागाचे सहसचिव बनवण्यात आले. डिसेंबर 2018 मध्ये मुंबई एड्स नियंत्रण प्रकल्प अधिकारी म्हणून जबाबदारी स्वीकारली.
नागपूरमध्ये भाजप नेत्यांशी थेट सामना –
जानेवारी 2020 मध्ये तुकाराम मुंढे देवेंद्र फडणवीसांचा बालेकिल्ला नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त झाले. नागपूर महानगर पालिका आयुक्त असताना त्यांच्या कारकीर्दीची बरीच चर्चा झाली. त्यांचा महापौरांबरोबरही वाद झाला होता. हा वाद थेट देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहचला होता. मुंढे यांच्याविरोधात महापौर, सत्ताधारी आणि विरोधक, असा सामना रंगला होता. या वादात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील उडी घेतली होती. त्यामुळे मुंढेंची पुन्हा बदली झाली. नितीन गडकरी यांनी पंतप्रधान कार्यालयाचे राज्य मंत्री जितेंद्र सिंह आणि केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी विकास मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्याकडे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधात तक्रार केली होती. यावेळी सामान्य नागपूरकरांचा तुकाराम मुंढेंना पाठींबा होता. मात्र मुढेंची पुन्हा बदली करण्यात आली.
ऑगस्ट 2020 मध्ये त्यांनी महाराष्ट्र जीव प्राधिकरण मुंबई येथे सदस्य सचिव म्हणून पदभार स्वीकारला. जानेवारी 2021 मध्ये राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे गेले. सप्टेंबर 2022 मध्ये त्यांनी आरोग्य सेवा आयुक्त आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान संचालक म्हणून काम केले. आता 29 नोव्हेंबर 2022 रोजी त्यांची पुन्हा एकदा बदली झाली, अद्याप पोस्टिंगचा निर्णय झालेला नाही.
कोणत्या सरकारमध्ये कितीवेळा बदल्या –
काँग्रेस आघाडीचे सरकार असताना तुकाराम मुंढे यांची 8 वेळा बदली करण्यात आली तर 2014 नंतर फडणवीस सरकार असताना 6 वेळा बदली करण्यात आली. 2019 मध्ये राज्यात महाविकास आघाडी सरकार आले. यामध्ये काँग्रस, राष्ट्रवादी काँग्रेस यांची युती होती. उद्धव ठाकरे यांच्याकडे सरकराचे नेतृत्व होते. उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात मुंढे यांची 3 वेळा बदली करण्यात आली. त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर तुकाराम मुंढे यांची 2 वेळा बदली करण्यात आली.
महत्वाच्या बातम्या :
- Hair Care Tips | हिवाळ्यामध्ये केसांना निरोगी आणि दाट बनवण्यासाठी करा आहारात ‘या’ गोष्टींचा समावेश
- Sanjay Raut | “उदयनराजेंचे जे अश्रू आहेत ते…”; संजय राऊतांची प्रतिक्रिया
- Mohommad Kaif | Live कॉमेंट्रीमध्ये मोहम्मद कैफने उडवली युजवेंद्र चहलची खिल्ली, म्हणाला…
- Atul Bhatkhalkar | “एकनाथ शिंदे त्यांच्यासारखे रिकामटेकडे आणि…”; आदित्य ठाकरेंच्या आव्हानावर भाजपाचा टोला
- PM Kisan Yojana | PM किसान योजनेचा लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांना आधार कार्डसोबत ‘हे’ डॉक्युमेंट पण करावे लागेल लिंक