तुकाराम मुंढेचा पहिल्याच दिवशी दणका! गणवेशात नसल्याने अधिका-याला बैठकीतून बाहेर काढलं

tukaram mundhe

नाशिक – आपल्या प्रामाणिकपणा आणि सचोटीसाठी प्रसिद्ध असलेले आय ए एस अधिकारी तुकाराम मुंढे यांची पीएमपीएमएलमधून बदली होऊन ते नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त झाले आहेत. आज ( शुक्रवार ) रोजी ते महापालिकेतील आपल्या दालनात सकाळी १० वाजताच हजर झाले. पण यावेळी बाकीचे अनेक अधिकारी आलेच नसल्याने उपस्थित अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली. मुंढेंनी पहिल्याच दिवशी आपल्या काटेकोर आणि शिस्तबद्ध स्वभावाची चुणूक दाखवत दणका दिला आहे. अग्निशमन दलाचे अधिकारी अनिल महाजन यांना गणवेश नसल्याने तुकाराम मुंढेंनी बैठकीतून बाहेर काढलं. यावेळी त्यांनी अधिका-यांना गणवेश घालून येण्याच्या सुचनाही केल्या.

नाशिक महापालिकेचे मावळते आयुक्त अभिषेक कृष्ण यांची मुंबई एमआयडीसीच्या सह मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली झाल्यानंतर त्यांच्या जागेवर पुणे महानगर परिवहन महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांची आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी महापालिका मुख्यालय असलेले राजीव गांधी भवन गाठले आणि आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला. मुंढे यांनी मुख्यालयात प्रवेश करतानाच आसपासच्या दालनांची माहिती घेत ते पुढे गेले. महिला स्वच्छतागृहाचे दरवाजे उघडे दिसल्यानंतर त्यांनी ते बंद करण्याची सूचना केली. तर लगतच पाणी गळती होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्याबाबतही त्यांनी सूचना केल्या.