PMPML- तुकाराम मुंढे PMPMLचे मालक आहेत का?

tukarm mundhe agianst pune political leaders

पुणे :  पुण्यात (PMPML)पुणे महानगर परिवहन मंडळ अध्यक्ष पदावर विराजमान झाल्यापासून मुंढे यांनी तोट्यात चालणाऱ्या पीएमपीएलच्या बसला मार्गावर आणण्यासाठी धडाकेबाज निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. मात्र, हे निर्णय घेत असताना मुंढे यांनी नुकतच शालेय विद्यार्थ्यांची ने-आण करण्यासाठी भाड्याने देण्यात येणाऱ्या ‘पीएमपीएल’च्या बस दरामध्ये अडीचपटीने वाढ केली आहे. याच निर्णयामुळे आता मुंढे विरुद्ध सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी वाद निर्माण होत आहे.

शाळांना देण्यात येणाऱ्या बसच्या शुल्कात वाढ करण्याच्या निर्णयामुळे शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागला होता. हा निर्णय घेताना तुकाराम मुंढे यांनी पीएमपीएलच्या संचालक मंडळाला विश्वासात घेतले नसल्याची टीका विरोधी पक्षांकडून पालिकेच्या मुख्यसभेत करण्यात आली होती.

आता मुंढे यांच्या याच निर्णयावरून पुणे महापालिका स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी मुंढेवर टीकेची झोड उठवली आहे.  पीएमपीएल बसच्या दरामध्ये अडीचपट भाववाढ करण्यात आली आहे. हा निर्णय घेताना मुंढे यांनी पीएमपीएलच्या संचालक मंडळाला विश्वासात घेतले नसून तुकाराम  मुंढे हे पीएमपीएलचे मालक असल्यासारखे वागत असल्याची टिका स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी केली आहे. तसेच मुंढे यांनी अचानकपणे शाळांच्या बस बंद केल्याने मुलांचे हाल होत असून भाडे वाढवल्यामुळे शाळांना पर्यायी व्यवस्था सुध्दा करता आली नाही. मनमानी पध्दतीने मुंढे काम करत असल्याचा आरोप ही मोहोळ यांनी केला आहे.

काही दिवसांपूर्वीच पिंपरी चिंचवडच्या स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे आणि तुकाराम मुंढे यांच्यामध्ये यांच्यात वाद रंगला होता त्यानंतर आता पुणे महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षांनीही मुंढे यांच्या कामाच्या पद्धतीवर टीका केल्याने पुन्हा एकदा मुंढे विरुद्ध लोकप्रतिनिधी वाद निर्माण झाल्याच दिसून येत आहे