प्रवाशांच्या हितासाठी नियमानुसार काम केले म्हणजे हिटरलशाही आहे का?

उत्पन्न, प्रवासी संख्येत वाढ , मग ही हिटलरशाही कशी ? - तुकाराम मुंढे

पुणे : प्रवाशांच्या हितासाठी नियमानुसार काम केले, शिस्तभंगाची कारवाई केली म्हणजे हिटरलशाही आहे का? आतापर्यंत कोणत्याही नियम, रचनेशिवाय काम चालत होते. कोणतेही व्हिजन, मिशन नव्हते. अनेकांची मनमानी बंद केली. बससेवेत लक्षणीय बदल केला. मार्गावरील बस, उत्पन्न, प्रवासी संख्येत वाढ झाली आहे. मग ही हिटलरशाही कशी़, असा प्रश्न पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (पीएमपी) अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी उपस्थित केला आहे. तसेच कोणीही काहीही म्हटले तरी यापुढील काळातही नियमानुसार काम करूनच ‘पीएमपी’ सक्षम करणार असल्याचे मुंढे यांनी म्हटले आहे.

‘पीएमपी’ची कमान मुंढे यांच्या हाती येणार असल्याने दहा महिन्यांपूर्वी ‘पीएमपी’तील कामगार संघटना तसेच प्रवासी संघटनांकडून आनंद व्यक्त करण्यात आला होता. पण मुंढे यांनी मागील दहा महिन्यांत घेतलेल्या विविध निर्णयांमुळे तसेच कर्मचाऱ्यांवरील कारवाईच्या धडाक्यामुळे सर्व संघटना नाराज झाल्या आहेत. पास दरवाढीसह प्रवाशांच्या हिताचे कोणतेही निर्णय घेतले जात नसल्याबद्दल प्रवासी संघटनांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे, तर अनेक कर्मचाऱ्यांची बडतर्फी, निलंबन बेकायदेशीरपणे केले जात असल्याचा आरोप कामगार संघटनांकडून केला जात आहे. त्यातच काहींनी मुंढे यांच्यावर हिटलरशाहीचा आरोप केला होता. त्याला मुंढे यांनी आतापर्यंत केलेल्या सुधारणांचा आलेख मांडून सडेतोड उत्तर दिले आहे.

You might also like
Comments
Loading...